Header Ads

Loknyay Marathi

ग्रंथालयांचे बदलते स्वरूप व वाचन संस्कृती - एकदिवसीय चर्चासत्र संपन्न

ग्रंथालयांचे बदलते स्वरूप व वाचन संस्कृती - एकदिवसीय चर्चासत्र संपन्न 

 सांगली | 16/2/2019 




 शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली यांचे संयुक्त विद्यमाने अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत ‘ग्रंथालयांचे बदलेते स्वरूप व वाचन संस्कृती’ या विषयावर दि. १६ फेब्रुवारी २०१९ रोजी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते. प्रारंभी ग्रंथपाल प्रा. सौ. जे. डी. हाटकर यांनी कार्यशाळेचा हेतू विषद करत ग्रंथालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. सदरच्या कार्यशाळेत ज्येष्ठ लेखक मा. नामदेव माळी, ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. विष्णू वासमकर, पत्रकार श्री. नामदेव भोसले यांनी आपले विचार व्यक्त केले. 

 प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रा. वैजनाथ महाजन म्हणाले की, संवेदना जीवंत ठेवण्याचे कार्य पुस्तके करतात. इथून पुढच्या काळात मुलांनी ग्रंथालयात रमले पाहिजे व कसदार ग्रंथांचे वाचन केले पाहिजे, त्याशिवाय खरे शिक्षण मिळणार नाही. पुस्तकांची संगत आपल्याला बरेच काही देवून जाते म्हणून पुस्तकांची मैत्री केली पाहिजे, त्यासाठी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात गेले पाहिजे त्याशिवाय तरणोपाय नाही. जोपर्यंत माणसात उत्सुकता जीवंत आहे आणि जिज्ञासा हा घटक जागृत आहे तोपोर्यंत वाचन संस्कृतीचा लोप होणार नाही. त्यासाठी जिज्ञासा व उत्सुकता हे दोन मुलभूत घटक प्रत्येक माणसाने जोपासले पाहिजेत, त्याशिवाय खऱ्या अर्थाने विकास होणार नाही.

अध्यक्ष म्हणून बोलताना प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, विद्यार्थ्यांत वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. ज्ञानवृद्धी करण्याचे काम खऱ्या अर्थाने ग्रंथालये करीत असतात. समृद्ध ग्रंथालये हीच खरी मोठी संपत्ती आहे व ती जतन करण्याची जबाबदारी तरुणाईने केली पाहिजे. मार्गदर्शनपर भाषणात मा. नामदेव भोसले म्हणाले ग्रंथ चळवळ अधिक गतिमान करणेसाठी शासन, शिक्षण संस्था आणि जनता यांनी संयुक्तपणे कार्य करण्याची नितांत गरज आहे. विशेषत: महाविद्यालयांनी त्यामध्ये पुढाकार घेण्याची गरज आहे. या प्रसंगी बोलताना मा. श्री. नामदेव माळी म्हणाले की, साहित्य जगण्याची प्रेरणा देते, ज्ञानसमृद्धीची साधने म्हणजे पुस्तके आहेत एवढेच नव्हे तर ग्रंथालये ही ज्ञान मंदीरे आहेत. प्रसार माध्यमांचा कितीही भडीमार झाला तरी वाचनाचे महत्त्व कमी होणार नाही. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील मा. प्रा. डॉ. मनोहर वासवानी व श्री. अविनाश भाले हे मार्गदर्शन करताना म्हणाले माणूस अपंग किंवा अंध असला तर तो जीवनात निराश होवून खचून जातो. अशा वेळी त्याला ग्रंथालाये व पुस्तकेच प्रेरणा देतात, जीवनात उभी करतात, समाजासमोर एक आदर्श व्यक्ती म्हणून व इतरांचा आयडॉल म्हणून उभे करतात हे स्वत:च्याच उदाहरणाने सांगितले. समारोप प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. विष्णू वासमकर म्हणाले की, वाचन आणि लेखन हा शिक्षण व्यवस्थेचा मुख्य पाया आहे. अलीकडच्या काळात वाचन आणि लेखन करणाऱ्यांची संख्या घटत आहे ही चिंतेची व चिंतनाची बाब आहे. 


 कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ.सौ. प्रभा पाटील यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. प्रकाश कुंभार यांनी मानले. कार्यक्रमास अग्रणी महाविद्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या महाविद्यालयातील ग्रंथपाल, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. 

(Bharati Vidyapeeth Sangli - Dr.Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)