Header Ads

Loknyay Marathi

मानवाच्या शाश्वत विकासासाठी ऊर्जा क्षेत्रात नवनवीन संशोधन होण्याची गरज : डॉ. एस. आय. पाटील

मानवाच्या शाश्वत विकासासाठी ऊर्जा क्षेत्रात नवनवीन संशोधन होण्याची गरज : डॉ. एस. आय. पाटील

सांगली- ११/०१/२०२०


नॅनोतंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण संशोधनामुळे अशक्य असणाऱ्या अनेक गोष्टी आज शक्य झालेल्या आहेत. मानवी ज्ञानेंद्रियांना मर्यादा असणाऱ्या अनेक वस्तू, उपकरणे विज्ञान संशोधनामुळे अस्तित्वात आल्यामुळेच मानवी जीवनात अमूलाग्र बदल निर्माण झाला आहे. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व मानवाच्या समोर असणाऱ्या अनेक समस्या सोडवण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधनाची विद्यार्थ्यांनी कास धरावी. पवन, औष्णिक, सौरऊर्जा बरोबर वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणातील ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधनाची गरज आहे. कारण यातूनच मानवाचा शाश्वत विकास होणार असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. एस. आय. पाटील यांनी केले.

सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात 'मूलभूत व उपयोजित विज्ञानातील बदलते प्रवाह' या विषयावर आयोजित केलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. एस. आय. पाटील बोलत होते. 

या वेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. के. एन. कोडम, भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम, शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, परिषदेच्या समन्वयक डॉ. सौ. जया कुर्हेकर, डॉ. अमित सुपले, सर्व विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी भारती विद्यापीठ व  डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राबवित असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड निर्माण व्हावी, तसेच त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी, नाविन्यपूर्ण संशोधनाची माहिती व ज्ञानाची देवाणघेवाण नवोदित संशोधकांना व विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने ही राष्ट्रीय परीषद महाविद्यालयात आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.
(Bharati Vidyapeeth Sangli - Dr.Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)