छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन - आपणास या गोष्टी माहित आहेत का ?
छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक
बालपण :
छत्रपती संभाजी राजांचा जन्म १४ मे इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. छत्रपती संभाजीराजांच्या आई, सईबाईंचे निधन राजे लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ पाटील ही कुणब्याची स्री त्यांची दूध आई बनली. छत्रपती संभाजींचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली.
राज्याभिषेक :
१६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराज छत्रपती झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी अण्णाजीपंत आणि मोरोपंत यांना अटक केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जेष्ठ पुत्र संभाजी महाराज यांना स्वराज्याचे दुसरे छत्रपती होण्यासाठी रायगड येथे राज्याभिषेक करण्यात आला.
मुद्रा व दानपत्र :
श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते |
यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||
|| मतं मे श्री शिवराजपुत्रस्य श्रीशंभूराज ||
|| छत्रपते: यद्त्रोपरिलेखितं || छं || श्री ||
प्रधान मंडळ :
सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती - संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (सेनाधीशांचे सेनाधीश - सर्वोच्च अधिकार असलेले)
श्री सखी राज्ञी जयति छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले (संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)
सरसेनापती - हंबीरराव मोहिते
छंदोगामाद्य - कवी कलश
पेशवे - निळो मोरेश्वर पिंगळे
मुख्य न्यायाधीश - प्रल्हाद निराजी
दानाध्यक्ष - मोरेश्वर पंडितराव
चिटणीस - बाळाजी आवजी
सुरनीस - आबाजी सोनदेव
डबीर - जनार्दनपंत
मुजुमदार - अण्णाजी दत्तो
वाकेनवीस - दत्ताजीपंत
औरंगजेबाची दख्खन मोहीम :
औरंगजेबाने इ.स. १६८२ मध्ये मराठ्यांवर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत छत्रपती संभाजीराजांपेक्षा जास्त होते. ते सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर औरंगजेबाचे छत्रपती संभाजीराजांच्या स्वराज्यापेक्षा कमीतकमी १५ पटींनी मोठे होते. जगातीला सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही छत्रपती संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय. औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. छत्रपती संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची छत्रपती संभाजीराजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. छत्रपती संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.
साहित्यिक छत्रपती संभाजीराजे :
अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता. छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला.
बुधभूषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील छत्रपती शिवाजीराजे यांचा उल्लेख आहे.
याचबरोबर छत्रपती संभाजीराजांनी नाईकाभेद, नखशिखा, सातसतक या तीन ग्रंथांचे लिखाण केले. गागाभट्टांनी समनयन हा ग्रंथ लिहून संभाजीराजांना अर्पण केला.
Post a Comment