सहा वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच पहिलीला प्रवेश?
सहा वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच पहिलीला प्रवेश?
डिसेंबपर्यंतचे वय ग्राह्य़ धरण्याचा शिक्षण विभागाचा विचार
शाळेच्या वेळा, अभ्यासक्रमाचा ताण आणि त्याचबरोबर वयानुरूप कौशल्य विकासाची गरज लक्षात घेऊन किती वर्षांच्या मुलांना कोणत्या इयत्तेत प्रवेश द्यावा याबाबतचा निर्णय शासनाने निर्णय जाहीर केला. त्यानुसार पूर्व प्राथमिकला तिसऱ्या वर्षांपासून प्रवेश देण्याची अट २०१० मध्ये निश्चित करण्यात आली. त्याचप्रमाणे पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षांची अट निश्चित करण्यात आली होती. २०१० पासून टप्प्याटप्प्याने दरवर्षी वयाचा निकष बदलण्यात आला. त्यानुसार यंदा (२०१९-२०) सहा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांलाच पहिलीला प्रवेश देणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात पहिलीतील प्रवेशासाठी हा निर्णय कागदोपत्रीच राहिला असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात सव्वापाच-साडेपाच वर्षांच्या मुलांना पहिलीच्या वर्गात प्रवेश मिळत आहे.
पहिलीतील प्रवेशासाठी सहा वर्षांची अट निश्चित करण्यात आली तेव्हा मुलांचे ३१ जुलैपर्यंतचे वय ग्राह्य़ धरण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, ऑगस्टमध्ये जन्माला आलेल्या मुलांचे काहीच दिवसांच्या फरकाने नुकसान होत असल्याचा आक्षेप पालकांनी घेतला. त्यानंतर २०१७ मध्ये या निकषात सुधारणा करून ३० सप्टेंबपर्यंतचे वय ग्राह्य़ धरण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी यंदाही ऑक्टोबरमध्ये जन्माला आलेल्या मुलांचे नुकसान होत असल्याचा आक्षेप घेण्यात आला. म्हणून शिक्षण विभागाने ही अट पुन्हा बदलली. १५ ऑक्टोबपर्यंत सहा वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना पहिली प्रवेशासाठी पात्र ठरवण्यात आले. तरीही ही अट पुन्हा बदलण्याची मागणी पालक सातत्याने करीत आहेत. त्यामुळे आता पुढील शैक्षणिक वर्षांपासून (२०२०-२१) ३१ डिसेंबपर्यंत सहा वर्षे पूर्ण होत असलेल्या मुलांना जूनमध्ये पहिलीच्या वर्गात बसवण्याची मुभा देण्याचे शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे कागदोपत्री प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण अशी अट असली तरी वर्गात साडेपाच वर्षांची मुले बसणार आहेत.
पालकांची मागणी :
राज्याच्या शाळांमध्ये पहिलीतील प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असण्याची अट घालण्यात आली असली तरी केंद्रीय शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळांमध्ये साडेपाच वर्षे पूर्ण झालेल्या मुलांनाच पहिलीला प्रवेश देण्यात येतो. राज्यमंडळासाठी सहा वर्षांची अट असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. अनेक राष्ट्रीय परीक्षा, सैन्य भरतीच्या प्रवेश परीक्षांमध्ये राज्यमंडळच्या मुलांचे एक वर्षांचे नुकसान होत असल्याचा आक्षेप पालकांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे एक-दोन महिन्यांच्या फरकाने मुलांची इयत्ता बदलते. भावंडे, मित्र हे वेगवेगळ्या इयत्तेत असतात, त्याचा मुलांवर परिणाम होतो असे पालकांचे म्हणणे आहे.
कमी वयात भार वाढल्यास नुकसान :
पूर्व प्राथमिक शिक्षणाबाबत नुकत्याच जाहीर झालेल्या ‘असर’च्या अहवालामध्ये कमी वयाच्या मुलांना पहिलीला प्रवेश दिल्यामुळेही गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. राज्यातील फक्त नागपूर जिल्ह्य़ाचा विचार करता पहिलीच्या वर्गातील ११ टक्के विद्यार्थी हे सहा वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. सहा वर्षांखालील मुलांच्या शारीरिक क्षमता, कारक क्षमता, आकलन क्षमता विकसित होणे गरजेचे असते. त्यानंतर अक्षरओळख, अंकओळख किंवा औपचारिक शिक्षण होणे अपेक्षित असते. कमी वयात औपचारिक शिक्षण सुरू झाल्यास विद्यार्थ्यांच्या क्षमताविकासात अडथळे येऊ शकतात, असे निरीक्षण विविध अहवालांमध्ये नोंदवण्यात आले आहे.
Post a Comment