Header Ads

Loknyay Marathi

राजर्षी शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण

राजर्षी शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण
कोल्हापूर  : या देशात राजे अनेक झाले, पण ज्या वेळी समाजाचे सत्व गेले होते, त्या वेळी समाजाला संघटित करण्याचे काम छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी केले. त्यांचे हे स्मारक नव्या पिढीला प्रेरणा देईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. 

कोल्हापूर येथील दसरा चौकात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे लोकार्पण  मा. शरद पवार यांच्या हस्ते रविवारी (ता. १९) झाले. त्या वेळी ते बोलत होते. मा. शरद पवार म्हणाले, की शाहू महाराज यांनी सत्ता ही उपेक्षित घटकांसाठी वापरली. त्यांनी शिक्षण, शेती, मल्ल विद्या, उद्योग, व्यापार यांचा व्यापक विचार केला होता. तसेच एका ठिकाणी शाहू महाराजांनी त्यांच्यापेक्षा मोठ्या पहिलवानाशी कुस्ती जिंकून, कुस्ती ही शक्तीने नाहीतर युक्तीने जिंकता येते हे दाखवून दिले. शाहू महाराज यांच्या कार्याचा देशातील अनेक ठिकाणी गौरव केला जात होता. त्या काळी आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय खूप मोठा असल्याचे  मा. शरद पवार यांनी सांगितले.

या वेळी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती मालोजीराजे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, इतिहासतज्ज्ञ जयसिंग पवार आदी उपस्थित होते.

अभिवादन करण्यासाठी शाहूप्रेमींची गर्दी: 
उशीरापर्यंत समाधीस्मारकस्थळी अभिवादनासाठी शाहूप्रेमींनी गर्दी केली होती.


लोकार्पण सोहळ्याच्या मुख्य दिवशी स्मारक परिसर सुशोभित केला होता. येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि करवीर संस्थापिका ताराराणी यांची मंदिरे फुलांच्या माळांनी सजविली होती. प्रवेशद्वाराजवळच ढोल ताशांचा ठेका वातावरणात जोश निर्माण करत होता. शाहीर रंगराव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या पोवाड्यांनी वातावरणात वीरश्री निर्माण केली. पोलिस बँडने सोहळ्याला संगीत साज चढवला होता.

शाहूप्रेमाने भारलेल्या रयतेने हा सोहळा याची देही अनुभवला. त्यानंतर नागरिकांनी दर्शनासाठी स्मारकाजवळ गर्दी केली. सोहळ्याचे औचित्य साधून खासबाग येथील राधाकृष्ण सत्कार्य सवंर्धन मंडळाच्यावतीने शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष प्रदीप मराठे, उपाध्यक्ष विवेक कोरडे यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे समता ज्योतीचे आयोजन करण्यात आले होते. कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळापासून ज्योत घेवून शाहूप्रेमी समाधीस्मारकस्थळी दाखल झाले. तेथून शाहू मॅरेथॉन मंडळाचे कार्यकर्ते ज्योत घेवून दसरा चौक, शिवाजी चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी येथून बिनखांबी गणेश मंदिर येथे दाखल झाले. तेथे 'शाहू मिल बचाव' या आशयाच्या डिजीटल फलकाजवळ ज्योत ठेवण्यात आली. यावेळी मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या जीवन चरित्रावरील पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.