१० वी बोर्ड परीक्षेला जाताना "ही" काळजी नक्की घ्या
१० वी बोर्ड परीक्षेला जाताना "ही" काळजी नक्की घ्या
फेब्रुवारी-मार्च महिना म्हणजे बोर्ड परीक्षांचा हंगाम. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या डोक्यावर प्रचंड टेन्शन असतं. वर्षभर भरपूर अभ्यास केल्यानंतर आता प्रत्यक्ष परीक्षेची वेळ आलीय. या काळात नेमकी काय-काय काळजी घ्यायला हवी, ते आम्ही सांगतोय खास तुमच्यासाठी...
करिअरच्या दृष्टिने पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी बोर्ड परीक्षेतल्या गुणांना खूप महत्त्व असतं. त्यामुळे विद्यार्थी वर्षभर भरपूर अभ्यास करत असतात. या अभ्यासानंतर प्रत्यक्ष परीक्षेची वेळ जसजशी जवळ येते तसतसं अनेक विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढायला लागतं. प्रत्यक्ष परीक्षेच्या काळातलं नियोजन योग्य पद्धतीने केल्यास परीक्षेत यश मिळवणं अवघड नाही.
परीक्षेपूर्वीचं व्यवस्थापन
परीक्षेतल्या यशासाठी वर्षभर सातत्याने केलेले प्रयत्न आवश्यक असतातच. पण परीक्षेच्या ऐन तोंडावर काय लक्षात घ्यायला हवं, त्याचा प्रामुख्याने विचार करू. परीक्षा जशी जवळ येऊ लागते, तसा मानसिक ताण वाढत जातो. योग्य ताण हा तुमचा ड्रायव्हिंग फोर्स ठरू शकतो.
पण ‘अतिताण’ हा नकारात्मक परिणाम करू शकतो. मग मनावरचा ताण योग्य तेवढाच आहे की नाही, हे कळणार कसं? पुढील काही लक्षणं पाहा.
नाडीचे ठोके अतिजलद पडणं. हृदयाची धडधड वाढून मन त्यावर केंद्रित होणं.
हातापायांची चुळबुळ होणं, मुंग्या येणं.
डोळ्यांना थकवा आल्यासारखं वाटणं.
नकारात्मक विचार मनात येणं. उदा. परीक्षेत आपल्याला काही आठवणार नाही, अभ्यासक्रमाबाहेरचं किंवा ऑप्शनला टाकलेल्या भागांवरच प्रश्न विचारले जातील इत्यादी.
शरीरात जडपणा, मंदपणा येऊन थकवा वाटणं इत्यादी.
भूक मंदावणं / अति खावंसं वाटणं
वरील लक्षणं दिसत असल्यास आपल्या मनावर अवाजवी ताण आहे, असं समजावं. या ताणाचं आधी योग्य व्यवस्थापन करायला हवं. त्यासाठी काही पर्याय पुढीलप्रमाणे असू शकतात.
दीर्घ श्वसन
मन आणि शरीराचं संतुलन टिकवण्यासाठी श्वसनावर नियंत्रण ठेवायला हवं. मेंदूला प्राणवायूचा पुरवठा नीट झाल्याने थकवा पळून जातो. त्यामुळे कार्यक्षमता वाढवण्यासाठी दीर्घ श्वसनाचा उपयोग होतो. हा दीर्घ श्वास सावकाश घ्यावा. काही क्षण तो फुफ्फुसांमध्ये रेंगाळून देऊन हळूहळू बाहेर सोडावा. प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका समोर आल्यावर आलेला तणावही अशा दीर्घ श्वसनाने झटक्यात नियंत्रणात येऊ शकतो.
कल्पनाचित्रं (Visualisation)
परीक्षेचा येणारा तणाव हा वर उल्लेख केल्याप्रमाणे, आपल्याला काही आठवणार नाही, प्रश्न कठीण असतील अशा नकारात्मक विचारांमुळे निर्माण होतो. अशावेळी एका ठिकाणी शांतपणे बसून सात-आठ वेळा प्रथम दीर्घ श्वसन करावं. शक्यतो मन प्रसन्न करणारं शांत सुरावटींचं संगीत ऐकावं. डोळे बंद करून मनाला आता परीक्षेच्या बाबत सकारात्मक चित्र दाखवावं. उदाहरणार्थ, माझा पूर्ण अभ्यास झाला असल्याने मी आत्मविश्वासाने परीक्षाकेंद्रात जात आहे, पेपरमध्ये आलेले प्रश्न आपल्याला चांगले लिहिता येत आहेत, आपण अचूक उत्तरं लिहीत आहोत अशा कल्पनाचित्रामुळे मनोबल वाढायला मदत होते, हे संशोधकांनी सप्रमाण सिद्ध केलं आहे. थोडा वेळ टीव्ही पाहणं, संगीत ऐकणं, लहान बाळांशी खेळणं, बाहेर फिरून येणं अशा उपायांनीही तणाव नियंत्रित करता येतो.
बहुतेक विद्यार्थी शेवटच्या क्षणीदेखील नवीन नोट्स, पुस्तकं मिळवण्याच्या नादात असतात. परीक्षेच्या महिनाभर आधी नवीन अभ्यास करण्याऐवजी आतापर्यंत केलेल्या गोष्टींचा सराव करावा. केलेला अभ्यास अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करा. उदाहणार्थ, मुद्यांना अधोरेखन करणं, सुवाच्य-सुटसुटीत पद्धतीने लिहिणं, सुबक आकृत्या, ग्राफचा सराव करणं इत्यादी.
परीक्षाकाळातला दिनक्रम
सकाळी लवकर उठावं.
थोडा वेळ बाहेर फेरफटका मारावा. सूर्यनमस्कारसारखा व्यायाम करावा. जेणेकरून शरीरात रक्ताभिसरण होऊन ताजंतवानं वाटेल आणि मनावरचा ताणदेखील हलका होईल. घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी वा स्कार्फ घालावा. कडक उन्हापासून डोळ्यांचं संरक्षण करण्यासाठी गॉगलचा वापर करावा.
बराच वेळ अभ्यास करून डोळ्यांवर ताण येतो. तेव्हा थोडा वेळ डोळे बंद करून त्यावर काकडीचे काप ठेवावेत.
परीक्षाकाळातील व्यवस्थापन
रात्रीचं जागरण टाळावं. अकारण साहसी प्रयोग करू नयेत. (झाडावर चढणं, अवजड वस्तू उचलणं). सुरी, कात्री वगरे धारदार वस्तूंचा जपून वापर करावा. परीक्षेच्या ठिकाणी जाताना सायकल वा अन्य वाहन जपून चालवावं.
परीक्षा हॉलमध्ये पोहोचल्यावर तसंच पेपर लिहिताना कोणाशीही बोलू नये. घशाला कोरड पडत असल्यास लिमलेटच्या गोळ्या जवळ ठेवाव्यात. उत्तरपत्रिकेवर बारकोड स्टिकर व हॉलोक्राफ्ट स्टिकर योग्य ठिकाणी चिकटवावं. उत्तरपत्रिकेवर योग्य ठिकाणी स्वतःची सही करावी. उत्तरपत्रिकेवर कुठेही स्वतचं नाव, पत्ता, फोन नंबर, जात, धर्म इत्यादी गोष्टी लिहू नका.
प्रत्यक्ष उत्तरपत्रिका लिहिण्यास सुरुवात करण्याआधी समास आखून घ्या. अक्षर शक्य तितकं नेटकं व स्वच्छ काढा. एखादं उत्तर बदलायचं असल्यास जुन्या उत्तरावर काट मारून नवीन उत्तर लिहा. परीक्षेच्या काळाचंही व्यवस्थित नियोजन करा.
आधी सर्व प्रश्नपत्रिका वाचून काढा. जो प्रश्न सोपा वाटत असेल, तो आधी सोडवा. पहिल्या अर्ध्या ते एक तासामध्ये गाळलेल्या जागा भरा, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरं लिहा. यासारखे पैकीच्या पैकी गुण मिळवणारे प्रश्न सोडवा. त्यानंतर थोडक्यात उत्तरं द्या. नंतर निबंधासारख्या दीर्घोत्तरी प्रश्नांकडे जा. थोडा विचार करून लिहिण्याची उत्तरं शक्यतो नंतर लिहावीत.
गणितासारख्या विषयामध्ये स्टेप्सना गुण दिले जातात. त्यामुळे विज्ञान वा गणित विषयाची उत्तरं लिहिताना स्टेप्सना महत्त्व आहे. यात अंतिम उत्तर चुकलं तरी स्टेप्सना मार्क दिले जातात.
उत्तरपत्रिकेत मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आकृत्या तसंच आलेखांचा वापर करावा. आकृत्या एचबी पेन्सिलने काढाव्यात.
भूमितीच्या परीक्षेत आकृत्या वा रचना काढण्यासाठी कंपासपेटीतील साधनांचा वापर करा.
दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरं लिहिताना उत्तरांचे मुद्यांनुसार भाग करावे. नवीन मुद्दा लिहिताना त्याला अंडरलाईन करा, तसंच नवीन परिच्छेद करा.
सारांश लेखन करताना त्यातले मुद्दे लक्षात घेऊन त्याचाच सारांशात उल्लेख करावा. निबंध लेखन करताना वर्तमानपत्रं, साप्ताहिकं यांच्यातले लेखांचा उपयोग होऊ शकतो. निबंधामध्ये एखाद्या विषयावरील तुमचे विचार, विषयाची मांडणी हे महत्त्वपूर्ण असतात. त्या विषयातील अद्ययावत माहितीसुद्धा उपयुक्त ठरू शकेल.
गणितासारख्या विषयात सूत्रं लक्षात ठेवावीत. भाषांमध्ये व्याकरणाकडे नीट लक्ष द्यावं. गणितासारखे पैकीच्या पैकी मार्क्स आपल्याला व्याकरणात मिळू शकतात.
उत्तरपत्रिका लिहिताना परीक्षकांच्या मानसिकतेचा विचार केल्यास तुम्ही आपल्या लिखाणामध्ये योग्य बदल करू शकता. साधारणतः पाच ते दहा मिनिटं एक उत्तरपत्रिका परीक्षकासमोर असते. आपलं अक्षर सुवाच्च व नेटकं असेल, खाडाखोड कमी असेल, तर उत्तरपत्रिका तपासताना परीक्षकांना नक्की बरं वाटेल.
पेपर संपवून बाहेर आल्यानंतर शक्यतो त्यासंबंधी चर्चा करणं टाळावं. काय काय उत्तरं लिहिली आहेत, हे ताडून पाहण्याचा मोह विद्यार्थी व पालकांनी टाळावा.
परीक्षेच्या काळात पालकांनी तसंच हितचिंतकांनीसुद्धा आपल्या उत्साहाला आणि चिंतेला आवर घातला पाहिजे. दहावी, बारावी, पदवी परीक्षा यांच्या काळात अगदी पेपरला जाईपर्यंत फोन करून शुभेच्छांचा भडिमार विद्यार्थ्यावर केला जातो. याचंदेखील विद्यार्थ्यांवर नकळत दडपण येतं हे लक्षात घ्यावं.
एखाद्या विषयात अभ्यासक्रमाबाहेरचा प्रश्न आला तर घाबरू नये. त्या परिस्थितीत बोर्डाकडून पूर्ण गुण दिले जातात.
तुम्हाला परीक्षेकरिता मन:पूर्वक शुभेच्छा..!
Post a Comment