Header Ads

Loknyay Marathi

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून ऑनलाईन अध्यापन प्रक्रिया - उदय सामंत

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून ऑनलाईन अध्यापन प्रक्रिया - उदय सामंत
(online teaching process so students do not suffer academic loss uday samant)



मुंबई- राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांना वर्क फ्रॉम होम (work from home) च्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शिकवणीसाठी ऑनलाइन अध्यापन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी  काळजी करू नये, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. सामंत म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असल्याने या संचारबंदीच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याकरिता सर्व तंत्रशिक्षण संस्थांमधील कामकाज 'वर्क फ्रॉम होम'  या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्यात येत आहे. हे ऑनलाईन कामकाज पूर्ण करण्यासंदर्भात तंत्रशिक्षण विभागाचे संचालक, डॉ. अभय वाघ हे व्हॉट्सऍप समूहावर मार्गदर्शन करीत आहेत.

प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अभ्यासक्रमांच्या अनुषंगाने माहिती पुरविणे तसेच पाठ्यक्रमानुसार व्हिडीओ तयार करून ते इमेल, व्हॉट्सऍपद्वारे उपलब्ध करून देणे, याचबरोबर ऑनलाइन संसाधनांचा (SWAYAM, NEAT, COURSERA , edX etc ) अध्ययनासाठी स्वतः प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी वापर करणे , Screen -o-matic सारख्या ऑनलाइन व्हिडीओ एडिटिंग प्रणालीचा वापर करून प्राध्यापकांनी विषय निहाय व्हिडीओ क्लिप तयार करून विद्यार्थ्यांना पुरविणे, व्हॉट्सऍप समूहाद्वारे नेमवून दिलेले कार्य (Assignment) पूर्ण करून घेणे, विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निरसण करणे, पुढील सत्राचे शैक्षणिक नियोजन विभागास सादर करणे, प्रश्नावलीची बँक तयार करणे, असे अनेक ऑनलाइन पर्याय  उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जास्तीत जास्त ऑनलाइन वापर करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, असे आवाहनही सामंत यांनी केले आहे. 

पुढील टप्प्यात सर्व संस्थांचा आढावा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाने नियोजन केले आहे. सर्व संस्था व प्राध्यापक यांना गुगल फॉर्म पाठवून त्यांनी वर्क फ्रॉम होम करताना वरीलपैकी कोणकोणते पर्याय वापरले, त्यांची परिणामकारकता काय, किती विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला या बाबी तपासण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक आणि संबंधित संस्थेचे प्राचार्य यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतनांमधील प्राध्यापकपदांना ७ वा वेतन आयोग लागू करताना शासनाने प्राध्यापकांची कामगिरी तपासण्यासाठी ३६० डिग्री फीडबॅक संकल्पना अनिवार्य केली आहे. यात प्राध्यापक वर्गाचे वार्षिक गोपनीय अहवाल, आणि '३६० डिग्री फीडबॅक' या बाबींचे मूल्यमापन करताना त्यांनी 'वर्क फ्रॉम होम' अंतर्गत केलेल्या कार्याचा मूल्यमापनाच्या दृष्टीने समावेश असेल अशा पद्धतीने आधुनिक तंत्रावर आधारित अध्यापन पद्धतींचा वापर करून या लॉकडाऊन कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच तंत्रशिक्षण संचालनालयाचे महत्त्वपूर्ण कार्यालयीन कामकाज विशेषतः मार्च अखेरची आर्थिक बाबींविषयक कामे सुद्धा दूरध्वनी, इमेल, व्हॉट्सअप च्या माध्यमातून पूर्ण करण्यात येत आहेत, असेही  सामंत यांनी संगितले.