Header Ads

Loknyay Marathi

विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री म्हणाले...

शिक्षणमंत्र्यांनी दिल्या सूचना... 



• केंद्र सरकारकडून लॉकडाउनचे टप्पे जसे खुले होतील, त्यानुसार करावे परीक्षांचे नियोजन 

• पंधरा दिवस असो की तीन महिन्यांपर्यंत असेच वातावरण राहिले तरीही परीक्षा होणारच 

• विद्यार्थ्यांची स्वप्नपूर्ती अन्‌ त्यांच्या भवितव्यासाठी कोणतीही अडचणी येवू नयेत 

• विद्यापीठांनी करावे परीक्षांचे नियोजन : केंद्राच्या सूचनेनुसार घ्याव्यात परीक्षा 

• सकाळ, दुपार, सायंकाळच्या सत्रात परीक्षा घेऊन तत्काळ निकाल जाहीर होतील, असे नियोजन करा 


कोरोनाच्या वैश्‍विक संकटाचा मुकाबला सुरु असतानाच आता केंद्र सरकारकडून लॉकडाउन टप्प्याटप्याने उठविण्याचे नियोजन सुरु झाले आहे. केंद्र सरकारच्या सूचनांनुसार विद्यापीठांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे नियोजन करावे. काही झाले तरीही परीक्षा होतीलच, अशा सूचना उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (ता. 6) राज्यातील सर्व कुलगुरुंना दिल्या. 

कोरोनाचा प्रादुर्भाव गर्दीच्या माध्यमातून वाढणार नाही, याची खबरदारी म्हणून केंद्र व राज्य सरकारने तत्काळ संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर केला. संभाव्य धोका ओळखून 31 मार्चपर्यंतचा लॉकडाउन 14 एप्रिलपर्यंत वाढविला. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचा शेवटचा भूगोल विषयाचा पेपर काही दिवसांसाठी रद्द करावा लागला. तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून विद्यापीठांनी केलेले परीक्षांचे नियोजनही रद्द करावे लागले. आता 14 एप्रिलला लॉकडाउन संपेल या आशेवर विद्यापीठांनी 27 एप्रिलपासून परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. मात्र, परीक्षा होतील की नाही, परीक्षा रद्द झाल्यास विद्यार्थ्यांना मागील सेमिस्टरच्या गुणांची सरासरी काढून गुण दिले जातील, या चर्चेला शिक्षणमंत्र्यांनी आज पूर्णविराम दिला. विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरी तथा त्यांच्या करिअरमध्ये अडचणी येऊ नयेत, यासाठी परीक्षा होतीलच असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता विद्यापीठांनी परीक्षांचे नियोजन सुरु केले आहे. 

कितीही दिवस लागले तरीही होतील परीक्षा 

राज्यातील सर्व विद्यापीठांअंतर्गत येणाऱ्या सुमारे साडेपाच हजार महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या 2019-20 या शैक्षणिक वर्षातील शेवटची परीक्षा लॉकडाउनमुळे झालेली नाही. मात्र, काही झाले आणि लॉकडाउनला कितीही दिवस लागले तरीही विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्यात, असे शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे स्पष्टपणे सांगितले आहे.

असा असेल संभाव्य बदल

• अडीच महिने चालणारी परीक्षा आता एक महिन्यात उरकली जाईल 

• व्यावसायिक व शैक्षणिक विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकत्रितपणे होतील 

• सकाळ, दूपार, सायंकाळच्या तिन्ही सत्रात होतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा 

• 30 ते 40 दिवसांत लागणारा निकाल आता 20 दिवसांत लावण्याचे नियोजन 

• उत्तरपत्रिका तपासणी अन्‌ पुनर्मूल्यांकनासाठी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची घेतली जाणार मदत 

• परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना मास्क बंधनकारक : सोशल डिस्टन्सिंग ठेवून सोडविले जाणार पेपर