शिक्षण क्षेत्रात प्रा. श्रीकृष्ण मोहिते यांनी केलेले कार्य कौतुकास्पद - ना. डॉ. विश्वजीत कदम
शिक्षण क्षेत्रात प्रा. श्रीकृष्ण मोहिते यांनी केलेले कार्य कौतुकास्पद - ना.डॉ. विश्वजीत कदम
बहुजन समाजाला उच्च शिक्षण मिळावे या व्यापक हेतूने डॉ. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली त्यातून अनेक गुणवंत शिक्षक तयार झाले. विशेषतः प्रा. श्रीकृष्ण मोहिते यांनी शिक्षण क्षेत्रात कार्य करीत असताना भारती विद्यापीठाच्या ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेले कार्य कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्गार राज्याचे कृषी व सहकार राज्य मंत्री ना. विश्वजीत कदम यांनी काढले.
भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.श्रीकृष्ण मोहिते यांच्या सेवा निवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी आ. मोहनराव कदम होते. प्रा. श्रीकृष्ण मोहिते व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. मालन मोहिते यांचा ना. विश्वजीत कदम व आ. मोहनराव कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले.
सत्कारालाउत्तर देताना प्रा. श्रीकृष्ण मोहिते म्हणाले की, भारती विद्यापीठ ही फक्त संस्था नाही तर ते एक कुटुंब आहे. भारती विद्यापीठ व कदम कुटुंबीयांनी माझ्यावर फार मोठ्या विश्वासाने जबाबदारी सोपविली ती मी प्रामाणिकपणे पार पाडली. मी भारती विद्यापीठात नसतो तर मला एवढे यश संपादन करता आले नसते. विद्यार्थी केंद्र बिंदू मानून मी कार्यरत राहिलो त्यामुळेच मला विविध क्षेत्रात यश संपादन करता आले. सौ. मालन मोहिते म्हणाल्या की, माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील महिलेला डॉ. पतंगराव कदम व मा. मोहनराव कदम यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर विराजमान होण्याची संधी दिली हे मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही.
मार्गदर्शनपर भाषणात ना. डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की डॉ. पतंगराव कदम साहेब व आ. मोहनराव कदम यांना चांगल्या माणसांची पारख होती त्यामुळेच त्यांनी प्रा. श्रीकृष्ण मोहिते व सौ. मालन मोहिते यांना सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय केले. उभयतांनी त्यांना मिळालेल्या संधीचे सोने केले. विशेषतः त्यांनी गावाशी नाळ तोडली नाही.
या प्रसंगी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या प्राप्त अनुदानातून उभारलेल्या नेटवर्किंग लॅब व इन्स्ट्रूमेंटेमेशन लॅबचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी प्रा. पद्माकर जगदाळे, प्रा. ए. एल. जाधव, दत्तात्रय मोहिते यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, शिक्षक, पालक, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, आजी-माजी विद्यार्थी व मोहिते सरांचे कुटुंब व ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कार्यक्रम प्रसंगी मा. आ. विक्रम सावंत, भारती विद्यापीठाचे विभागीय संचालक मा. डॉ. एच. एम. कदम, भारती बँकेचे संचालक मा. जितेश कदम, सरपंच मा. विजय मोहिते, डॉ. नितीन नायक, माजी नगरसेवक मा. हरीदास पाटील आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत तर महाविद्यालयातील प्राध्यापक, सेवक व स्नेहीजनांच्या साक्षीने पार पडला.
उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. प्रभा पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. सूर्यकांत बुरुंग यांनी केले.
Post a Comment