Header Ads

Loknyay Marathi

समाजहिताचा आणि सार्वजनिक कल्याणचा विचार करणारा दूरदृष्टीचा नेता म्हणजे डॉ. पतंगराव कदम - प्रा. वैजनाथ महाजन

समाजहिताचा आणि सार्वजनिक कल्याणचा विचार करणारा दूरदृष्टीचा नेता म्हणजे डॉ. पतंगराव कदम -  प्रा. वैजनाथ महाजन


जिद्द, जिगर आणि मेहनतीच्या जोरावर डॉ. पतंगराव कदम यांनी शिक्षण क्षेत्रात जे कार्य केले आहे ते अतुलनीय आहे. उत्तुंग  स्वप्ने बघणारा आणि स्वप्ने सत्यात आणणारा माणूस म्हणजे डॉ. पतंगराव कदम होय. त्यांनी नेहमीच गुणवत्तेच्या शिक्षणावर अधिक भर दिला. एवढेच नव्हे तर शिक्षणात गतिमानता आणली.  त्यांनी साहित्य व कला क्षेत्रासाठी केलेले कार्य फार महत्त्वाचे आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन कार्यरत राहण्याची गरज आहे. डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी केलेल्या समाजाभिमुख कार्यामुळे प्रत्येक माणसाला आपले ते आपले वाटतात. असे मत ज्येष्ठ साहत्यिक प्रा. वैजनाथ महाजन यांनी व्यक्त केले.


भारती विद्यापीठाचे संस्थापक  आणि माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगली येथील भारती विद्यापीठाच्या "डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात डॉ. पतंगराव कदम : व्यक्ती आणि कार्य" या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक  प्रा. वैजनाथ महाजन यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम होते.

उपस्थितांचे स्वागत विज्ञान विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. सौ. पी. एम्. पाटील यांनी केले. प्रारंभी डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून बोलताना भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य दीपस्तंभासारखे आहे. त्यांचा आदर्श इतरांनी घेण्याची गरज आहे.

डॉ. पतंगराव कदम यांच्या कार्याविषयी बोलताना प्रा. वैजनाथ महाजन म्हणाले की, शिस्त, श्रद्धा आणि भक्ती यामध्ये त्यांनी कधीच गल्लत केली नाही. डॉ. पतंगराव कदम हे उतुंग स्वप्ने पाहणारा माणूस मात्र त्यांनी त्यांच्या जीवनात वेळ आणि शिस्तीला प्राधान्य दिले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. भारती भाविकट्टी यांनी केले व उपस्थितांचे आभार कला व वाणिज्य शाखेचे प्रमुख प्रा. टी. आर. सावंत यांनी मानले.