डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ऑनलाईन पद्धतीने संपन्न
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा ऑनलाईन पद्धतीने संपन्न
भारती विद्यापीठाच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा प्रा. राम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी कणसे होते.
स्वागतपर भाषणात माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक प्रा. संजय ठिगळे म्हणाले की, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ही महाविद्यालयाची संपत्ती असून माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.
प्रा. डॉ अमित सुपले यांनी अंतर्गत गुणवत्ता हमी विभागाविषयी सविस्तर माहिती दिली.
मार्गदर्शनपर भाषणात प्रा. राम पवार म्हणाले की, चांगली माणसं भेटल्याशिवाय संस्था किंवा महाविद्यालये मोठी होत नाहीत. डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाने प्रतिकूल परिस्थितीत जी प्रगती केली त्याचे श्रेय दूरदृष्टी असणाऱ्या डॉ. पतंगराव कदम यांना द्यावे लागेल. त्यांचा आदर्श घेऊन माजी विद्यार्थ्यांनी कार्यरत राहावे. महाविद्यालयाच्या यशाचे मूल्यांकन हे विद्यार्थी कसे घडले, त्यांनी किती यश संपादन केले आणि समाजाशी किती एकरूप झाले यावरून ठरत असते. आपला विद्यार्थी आपल्यापेक्षा सर्व अर्थाने मोठा होतो तेव्हा जो आनंद मिळतो त्याचे मोल होत नाही.
अध्यक्ष पदावरून बोलताना प्राचार्य डॉ.डी.जी कणसे म्हणाले की, महाविद्यालयाचे विद्यार्थी हे आमच्या दृष्टीने भूषणावह असून भारती विद्यापीठाने नेहमीच विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून कार्य केले आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी आपले नाते अधिक वृद्धिंगत करावे. महाविद्यालय नेहमीच आपल्या पाठीशी राहील.
याप्रसंगी माजी विद्यार्थी नितीन नलावडे, अभिजीत पाटील, डॉ. शिवप्रसाद महाडकर, रौनक अलास्कर, वैजनाथ रुगे, दादासाहेब सरगर यांनी महाविद्यालयीन जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याबरोबरच महाविद्यालयाच्या सर्वागीण विकासाला मदत करण्याचे मान्य केले.
उपस्थितांचे स्वागत प्रा. संजय ठिगळे यांनी केले. आभार प्रा. डॉ. विकास आवळे यांनी मानले सूत्रसंचालन प्रा. रुपाली कांबळे यांनी केले. कार्यक्रमास कला व वाणिज्य शाखा प्रमुख प्रा. तानाजी सावंत, विज्ञान शाखा प्रमुख प्रा. डॉ. प्रभा पाटील त्याचबरोबर महाविद्यालयातील कनिष्ठ, व्यावसायिक व वरिष्ठ विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक त्याचबरोबर विविध क्षेत्रात कार्यरत असणारे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
Post a Comment