समाजाच्या शाश्वत विकासासाठी विज्ञान, तंत्रज्ञान व सामाजिक शास्त्रे यामध्ये समन्वय साधण्याची गरज : डॉ. मृणालिनी फडणवीस
समाजाच्या शाश्वत विकासासाठी विज्ञान, तंत्रज्ञान व सामाजिक शास्त्रे यामध्ये समन्वय साधण्याची गरज : डॉ. मृणालिनी फडणवीस
नॅनोतंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण संशोधनामुळे अशक्य असणाऱ्या अनेक गोष्टी आज शक्य झालेल्या आहेत. मानवी ज्ञानेंद्रियांना मर्यादा असणाऱ्या अनेक वस्तू, उपकरणे विज्ञान संशोधनामुळे अस्तित्वात आल्यामुळेच मानवी जीवनात अमूलाग्र बदल निर्माण झाला आहे. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी व मानवाच्या समोर असणाऱ्या अनेक समस्या सोडवण्यासाठी नावीन्यपूर्ण संशोधनावर भर दिला पाहिजे. असे विचार भारती अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू मा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी मांडले; तर विज्ञान - तंत्रज्ञान बरोबर सामजिक शास्त्रांचा समन्वय साधूनच संशोधन केले पाहिजे कारण यातूनच समाजाचा शाश्वत विकास होणार असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मा. डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले.
सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सामाजिक कल्याणासाठी विज्ञान, सामाजिक शास्त्रे व भाषा शास्त्रातील नवीन कल, आव्हाने व समस्या या विषयावर आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. माणिकराव साळुंखे व डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.
आंतरराष्ट्रीय परिषदेचे साधनव्यक्ती व यु. एस. ए. येथील सालीसबरी विद्यापीठाचे प्राध्यापक मा. डॉ. प्रवीण सप्तर्षी यांनी केवळ वरवरचे संसोधन न करता मानवाच्या गरजांचा आभ्यास करून त्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आपल्या संशोधनाचा कसा उपयोग होईल हे पाहणे सध्यकाळाची गरज असल्याचे सांगितले. शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख मा. डॉ. संभाजी शिंदे यांनी हवामान बदल, पीक व्यवस्थापन, नागरी, ऊर्जा, भूक व पाण्याच्या समस्या यावर तेच तेच संशोधन होत असल्याची खंत व्यक्त करून संशोधकांनी केवळ सर्टिफिकेट व डिग्री मिळवण्यापेक्षा सामाजिक कल्याणासाठी धडपड केली पाहिजे असे मत व्यक्त केले.
या वेळी ऑनलाईन व्यासपीठावर भारती विद्यापीठाचे मानद संचालक मा. डॉ. एच. एम. कदम, शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व या महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. पी. एम. पाटील, कला - वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग समन्वयक डॉ. ए. आर. सुपले, सहभागी संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी भारती विद्यापीठ व डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राबवित असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड निर्माण व्हावी, तसेच त्यांच्यामध्ये जिज्ञासा निर्माण व्हावी, नाविन्यपूर्ण संशोधनाची माहिती व ज्ञानाची देवाणघेवाण नवोदित संशोधकांना व प्राध्यापकांना व्हावी या उद्देशाने ही आंतरराष्ट्रीय परीषद महाविद्यालयात आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.
या ऑनलाईन कार्यक्रमाचे संयोजन या आंतरराष्ट्रीय परिषदेचे समन्वयक प्रा. डॉ. एन. व्ही. गायकवाड, टेक्निकल प्रमुख प्रा. अमोल वंडे, प्रा. मंगेश गावित, प्रा. डॉ. एम. टी. कोल्हाळ यांनी सहकार्य केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment