सामाजिक उत्तरदायित्व जपणारे - डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय - प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे १६/९/२०२१ | सांगली
सामाजिक उत्तरदायित्व जपणारे - डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय - प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे
आज जगामध्ये ज्ञान ही एक संपत्ती मानली जाते. राष्ट्राची प्रगती ही राष्ट्राच्या शैक्षणिक बाबीवर अवलंबून असल्याने नवोदित पिढीला ज्ञानाने सामर्थ्यवान बनविण्याबरोबरच संस्कारक्षम व कौशल्याने समृध्द बनविण्यासाठी अविरत कार्यरत राहून सामाजिक उत्तरदायित्व जपणारे भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त...
मानवी जीवनात स्वउन्नतीसाठी काम करणं ही नैसर्गिक प्रेरणा असते मात्र स्वउन्नती बरोबरच समाजाच्या उन्नतीसाठी अविरत कार्यरत राहणं, हे काही मोजक्याच लोकांमध्ये आढळणारं स्वभाव वैशिष्ट्य आहे. समाज आर्थिक संपन्न व ज्ञान समृद्ध बनवण्यासाठी तसेच राष्ट्राच्या विकासात भर घालण्यासाठी आपल्यापरीने कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था समाजाचं ऋण मानून महत्वपूर्ण योगदान देत असतात.
कोणत्याही देशाच्या शाश्वत विकासाच्या, प्रगतीच्या, परिवर्तनाच्या व प्रबोधनाच्या वाटा शिक्षणातूनच जातात. शिक्षणामुळेच देश प्रगतीपथावर पोहोचत असतो. देशहिताच्या व समाजहिताच्या दृष्टीने शिक्षणाचे असणारे अनन्यसाधारण महत्व विचारात घेऊनच संस्थापक मा. डॉ. पतंगराव कदम साहेब यांनी १० मे १९६४ या दिवशी पुणे नगरीत स्थापन केलेल्या भारती विद्यापीठाने आज देशाच्या सीमा पार करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी पदार्पण केले आहे.
भारती विद्यापीठाचे शिल्पकार आदरणीय डॉ. पतंगराव कदम साहेब यांचे नाव धारण केलेले सांगलीतील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय हे स्व. डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या विचाराचा, कार्याचा व संस्काराचा वसा आणि वारसा सातत्याने जोपासत आहे. शैक्षणिक गुणवत्ता व सामाजिक उत्तरदायित्वाच्या जोरावर केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक प्रगतीमुळे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रामध्ये महाविद्यालयाने गुणवत्तेची मोहोर उमटवली आहे.
कृष्णा माईच्या शांत, सुंदर आणि पवित्र किनाऱ्यावर वसलेल्या सांगली शहरात ज्ञानदानाचा अखंड यज्ञ जेथे सुरु आहे ते ग्रामीण व शहरी संस्कृतीचा वारसा लाभलेले हे महाविद्यालय होय.शैक्षणिक,सामाजिक सांस्कृतिक व क्रीडाविषयक आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन या ध्येयाने प्रेरित होऊन कार्यरत असलेले व समाज सेवेचा वारसा जपलेल्या या महाविद्यालयाला राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट कार्याबद्ल महाराष्ट्र राज्य शासनाने पुरस्कार देवून गौरव केला आहे. सांगली मिरज कुपवाड महानगर पालिकेने नुकताच स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून गुणगौरव केलेला आहे. अग्रणी महाविद्यालय म्हणून या महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठ स्तरावरती नेत्रदीपक व उत्कृष्ट कार्य करीत अलौकिक प्राप्त केला आहे.
भारत देशाला ऐतिहासिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, औद्योगिक व राजकीय परंपरा आहे. या परंपरेला योग्य दिशा देणारे, सकारात्मक विचार असणारे आणि विद्यायक कृती करणारे विद्यार्थी प्रतिनिधी निर्माण करणेसाठी व त्यांच्या सर्वागीण विकासासाठी अनेक अभ्यासपूरक व अभ्यासेत्तर नाविण्यपूर्ण उपक्रम या महाविद्यालयात राबविले जातात. कार्यशाळा, चर्चासत्रे, परिसंवाद, संशोधन परिषदा, माजी विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित केले जातात. राष्ट्रीय, राज्यस्तरीय कार्यशाळा, परिषदा आयोजित करुन नवोदित संशोधकांना, प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना उत्तम व्यासपीठ निर्माण केले आहे. समाजाच्या सर्वसमावेशक विकासासाठी विद्यार्थ्यांच्या मधील अस्वस्थ आणि अमर्याद उर्जेचा वापर करुन व्यक्तिगत, व्यावसायिक आणि सामाजिक विकास घडवून आणण्यासाठी, अल्पसंख्यांक समाजातील उमेदवारांसाठीचा पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कोर्स, शिवाजी विद्यापीठ जिल्हास्तरीय छात्रसभा, पर्यावरण संरक्षण संदेश देणारी महारॅली, जागर विवेकाचा, वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी विज्ञान प्रदर्शन, विज्ञान कार्यशाळा, राष्ट्रीय सेवायोजना विशेष श्रमसंस्कार शिबीर, दंतशिबीर, रक्तदान शिबीर, विविध क्रीडा स्पर्धा व शैक्षणिक सहली असे अनेक उपक्रम साजरे केले गेले.
स्वच्छता, रस्तेबांधणी, सर्वेक्षण, एडस्विषयक जनजागृती, शैक्षणिक शिबीर, भारतीयम करंडक, शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, वनराई बंधारे, पथनाटय, शैक्षणिक साहित्य वाटप अशा अनेक उपक्रमातून महाविद्यालयाने सामाजिक उपक्रम राबविले आहे. सन २०१९ मध्ये आलेल्या महापुरात महाविद्यालयाने कौतुकास्पद कार्य केले आहे. भारती विद्यापीठाचे कार्यवाह व भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या आवाहनानुसार पूर ओसरल्यानंतर भिलवडी येथील पूरबाधित क्षेत्राची स्वच्छता करुन औषध फवारणी महाविद्यालयाने केली आहे. याच कालावधीत सांगलीवाडी तील पूरग्रस्तांसाठी महाविद्यालयाची इमारत राहण्यासाठी दिलेली होती. महाविद्यालयाची भव्यदिव्य तीन मजली इमारत देवदूत म्हणून पूरग्रस्तांसाठी उपयोगात आली.
वैश्विक महामारी कोरोनाने ग्रासलेल्या या कालावधीत महाविद्यालयाने सांगली परिसरातील नामवंत डॉक्टरांची, तंज्ञ व्यक्तीची विविध व्याख्याने, चर्चासत्रे समाजासाठी व विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली आहेत. तणावपूर्ण व नकारात्मक झालेल्या वातावरणामध्ये सकारात्मक विचाराची ज्योत सदर कार्यक्रमातून सातत्याने तेवत ठेवली आहे.अनेक नवोपक्रम कार्यक्रमाचे संयोजन करणे, त्याचं नेटक आयोजन करणं, त्या सर्वाच्यासाठी पुरेशा सोयी उपलब्ध करुन देणं अन् या सर्व सोहळयाच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाला चालना व प्रोत्साहन देण्याची संधी साधणं हे या महाविद्यालयाचे खास वैशिष्टय आहे.
महाविद्यालयाचा आकार, भौगोलिक विस्तार हा भव्य दिव्य आहे. दर्जेदार पायाभूत सुविधांशिवाय शिक्षण संस्था प्रगतीच्या दिशेने जाऊ शकत नाही हे जाणलेल्या संस्थापकांनी या महाविद्यालयास नेत्रदीपक व प्रशस्त इमारत, सुसज्ज प्रयोगशाळा, समृध्द ग्रंथालय, अत्याधुनिक क्रीडा साहित्य व क्रीडांगण, उपहारगृह, अद्ययावत फर्निचर, डिजिटल क्लासरुम, स्वच्छ व मुबलक पाणी या सुविधा दिल्या आहेत. महाविद्यालयात संस्कृती, संस्कार, प्रथा-परंपरा आणि शिस्तबध्दता व शांतप्रिय आधुनिकतेचा अपूर्व मिलाप आहे.
महाविद्यालयाचं लौकिकरुप जे ऐकून असतात त्यांना प्रत्यक्षात या महाविद्यालयात प्रवेश केल्यास त्यांना महाविद्यालयाचं रुप कितीतरी पटीने लोभस आहे हे जाणवते. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तीनी या ना त्या प्रसंगी महाविद्यालयास भेट देऊन येथील उपक्रमांची प्रशंसा केली आहे. दि.१६ सप्टेंबर १९८५ रोजी शांतिनिकेतन महाविद्यालयाकडून भारती विद्यापीठास जोडलेल्या या महाविद्यालयास आज ३६ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारती विद्यापीठाच्या ऐतिहासिक वाटचालीमध्ये अनमोल योगदान देणाऱ्या या महाविद्यालयाने सांगली जिल्ह्याच्या नव्हे तर शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक जगतामध्ये स्वतःचे स्थान निर्माण करून समाधानकारक नावलौकिक मिळविलेला आहे.
शिक्षणाच्या माध्यमातून जनजागृती करावी, समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक उन्नतीसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ प्रशिक्षित करुन समाजाच्या सवींगीण विकासाला योगदान देण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अध्यापनाबरोबरच संशोधन क्षेत्रात मजल मारली आहे. दोन कोटीहून अधिक संशोधनासाठीचे अनुदान, विशेष प्रकल्प संशोधन करणारे, संशोधन प्रयोगशाळानी सुसज्ज असे शिवाजी विद्यापीठ अंतर्गत एकमेव हे महाविद्यालय आहे. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे महाविद्यालयातील प्राध्यापकांचे समाजोपयोगी यु.जी.सी. च्या मार्गदर्शक तत्वानुसार मेजर आणि मायनर रिसर्च प्रोजेक्टरचे काम समाधानकारक आहे. पीएच.डी. प्राप्त प्राध्यापकांची संख्या लक्षणीय आहे. उर्वरित प्राध्यापकांना पीएच.डी. करण्याविषयी तसेच नेट व सेट परीक्षा देण्याविषयी सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. ३६ वर्षापूर्वी सुरु झालेल्या या महाविद्यालयात आज २००० हून अधिक विद्यार्थी विविध शाखांतून अध्ययनाचे कार्य करीत आहे.
कला, विज्ञान, वाणिज्य व संगणक शाखांच्या विविध विषयातील पदवी शिक्षण, अँनालिटीकल केमिस्ट्री पदवी शिक्षण, यु,जी.सी. पुरस्कृत करियर औरिएंटेड कोर्सेस, व्यावसायिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण देणारे सांगली जिल्हयातील ज्ञानार्जनाचे प्रमुख केंद्र हे महाविद्यालय बनलेले आहे. याचे सर्व श्रेय संस्थापकांपासून प्रगतीच्या टप्यावर मोलाचे योगदान देणाऱ्या सर्वांना द्यावे लागेल. एकंदरीत विद्यार्थ्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबध्द असणारं हे महाविद्यालय गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या अन्य महाविद्यालयांच्या अग्रभागी आहे. संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीमध्ये स्वतःची आगळी वेगळी प्रतिमा निर्माण केलेल्या महाविद्यालयामध्ये प्राचार्यपद भूषविणे ही माझ्या शैक्षणिक कारकीर्दीतील अनमोल व अविस्मरणीय घटना आहे. महाविद्यालयाच्या ३६ वर्षाच्या वाटचालीचे सिंहावलोकन करताना या नोंदी महत्वाच्या तर आहेतच. कुणीही प्रेरणा घ्यावी अशा प्रेरक ही आहेत. गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन करीत व भविष्याचा वेध घेत ज्ञानांचे गीत हे महाविद्यालय संपन्नतेच्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सांगली नगरीत सदैव गात राहील.
राष्ट्राची प्रगती ही राष्ट्राच्या शैक्षणिक बाबीवर अवलंबून असल्याने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बदलणारी शिक्षणाची पद्धत स्विकारण्यासाठी सर्वांनी अद्यावत असले पाहिजे याकरिता हे महाविद्यालय सदैव तत्पर आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीच देशाला सामर्थ्यवान बनविण्यासाठी उपयोगी पडते. समाजातील विविध समस्या सोडविण्यासाठी ज्ञान, कौशल्य बरोबर नवनिर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षणाची कास धरावी लागेल. म्हणून देशाला सामर्थ्यवान बनविण्यासाठी व समाज उन्नतीकरिता नवनिर्मितीसाठी सज्ज होण्याची गरज आहे. हे ओळखून भविष्यात हे महाविद्यालय स्वतःच्या नावलौकिकाबरोबर संस्थेचा नांवलौकिक वाढविण्यामध्ये सातत्याने प्रयत्नशील राहील.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment