शिवाजी विद्यापीठ ४१ वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव-डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयास यजमानपद
शिवाजी विद्यापीठ ४१ वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव-डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयास यजमानपद
सांगलीः- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तापूर्ण विकासासाठी तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरलेल्या युवा महोत्सवाचे शिवाजी विद्यापीठ गेली ४० वर्षे सातत्याने संयोजन करीत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या विद्यापीठात जिल्हानिहाय महोत्सव संपन्न होत असतात. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने बुधवार दिनांक २२ डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या ४१ वा आंतरमहाविद्यालयीन सांगली जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे यजमानपद भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयास प्राप्त झाल्याचे शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात या युवा महोत्सवासंबंधी अधिक माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीचा युवा महोत्सव ऑनलाईन संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या औत्सुक्याचा आणि आनंदाचा क्षण असणारा युवा महोत्सव शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये ऑफलाईन साजरा होणार आहे. महाराष्ट्र शासन निर्णय व शिवाजी विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार कोविड-१९ प्रतिबंध व नियंत्रण नियमावलीच्या अनुषंगाने हा युवा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न करणारा हा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी आनंदाची एक पर्वणीच असते.शैक्षणिक जडणघडणीबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सांस्कृतिक युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. बुधवार दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी संपन्न होणाऱ्या या आनंदोत्सवामध्ये सांगली जिल्ह्यातील शिवाजी विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयातील १००० हून अधिक विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी होणार आहेत. बुधवारी सकाळी १०.०० वा. भारती विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, भारती विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. एच. एम. कदम, संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, शिवाजी विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे माजी संचालक प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे, आमदार सुधीर गाडगीळ, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य श्री संदीप परमणे, श्री विशाल गायकवाड या सन्माननीय मान्यवरांच्यासहित विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, पदाधिकारी यांची उपस्थिती या सोहळ्यास लाभणार आहे.
उद्घाटन झाल्यानंतर महोत्सवात पहिल्या सत्रात सकाळी१०.३० ते १.०० या कालावधीत लोकसंगीत वाद्यवृंद, समूहगीत, नकला, वक्तृत्व, पथनाट्य या स्पर्धा तर दुपारच्या सत्रात २.०० ते ६.०० या काळात एकांकिका, वादविवाद, लोककला, सुगम गायन,मूकनाट्य या स्पर्धा संपन्न होणार आहेत. तिसऱ्या सत्रात सायंकाळी६.०० ते १०.०० या कालावधीत लोकनृत्य, लघु नाटिका अशा स्पर्धा होणार आहेत. या सर्व सांस्कृतिक स्पर्धा रंगमंच १ ते ७ वर होणार असून फक्त पथनाट्य सांगलीवाडीतील राणा प्रताप चौक येथे संपन्न होणार आहेत. एकांकिका स्पर्धा विष्णुदास भावे नाट्यमंदिरात पार पडणार आहेत. शिवाजी विद्यापीठ नियुक्त तज्ज्ञ परीक्षक या सर्व स्पर्धांचे परीक्षण करणार आहेत. जिल्हास्तरीय युवा महोत्सवातून विजयीसंघ व विद्यार्थी मध्यवर्ती युवा महोत्सवासाठी निवडले जाणार आहेत. सृजनरंगांची बरसात करणारा शिवाजी विद्यापीठाचा युवा महोत्सव हा कॉलेज विश्वातील सर्वात मोठा आणि मानाचा महोत्सव मानला जातो. विविध कलागुणांची लयलूट असणाऱ्या या युवा महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालक, नागरिक व विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंध नियमाचे पालन करून उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे यांनी केले आहे. सामाजिक जाणिवेतून शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, समाजकारण आदी सर्वच क्षेत्रांतील तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय संशोधन परिषद कार्यशाळा, अधिवेशन, विविध क्रीडा स्पर्धा, साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाने गेली ३५ वर्षे केले आहे. भारती विद्यापीठ परंपरेला साजेसा उत्साही व शिस्तबद्ध वातावरणामध्ये हा रंगणारा तरुणाईचा जल्लोष यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी स्वयंसेवक अथक परिश्रम करीत आहेत.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya Sangli)
Post a Comment