छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रगत विचार समजून घेणे गरजेचे : डॉ. लक्ष्मण शिंदे
छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रगत विचार समजून घेणे गरजेचे : डॉ. लक्ष्मण शिंदे
सांगली : छत्रपती शिवाजी महाराज हे कधीही धार्मिक प्रभावाखाली आले नाहीत. सर्व जाती-धर्मांच्या लोकांना संघटित करून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली . आरमार उभारण्यासाठी वठलेली झाडेच तोडा, शेतीचे नुकसान करू नका, स्त्रियांप्रती आदर ठेवा. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रगत विचार आज समाजाने समजून घेणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे यांनी केली. येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या ऑनलााईन व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, शिवरायांची जिद्द, चिकाटी समजून घेतली पाहिजे. त्यांचा पुतळा मंदिरात बंदिस्त न ठेवता एक महापुरुषाच्या भूमिकेतून त्यांचे विचार प्रत्येकाने समजून घेतले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्येक लढाई संघर्षमय होती. लढाई लढताना ते सदैव सैनिकांच्या पुढे नेतृत्व करत. त्यामुळेच स्वराज्याच्या बलिदानासाठी अनेक मावळे स्वतःहून तयार होत. शिवरायांचा लढा हा दहशत निर्माण करण्यासाठी नव्हता तर न्याय हक्कासाठीचा होता. त्यांनी बुद्धिमत्ता, चातुर्य, गनिमीकावा, यांचा वापर करून स्वराज्य मिळविले. म्हणूनच आज तीनशेहून अधिक वर्षे झाली तरी जनमानसात ते वंदनीय आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते. अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी शौर्य, कल्पकता, संघटन आणि उत्तम व्यवस्थापन कौशल्य असल्यामुळेच स्वराज्य वाढले. आज जगभरात अनेक ठिकाणी शिवजयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व्यापक असून एका विशिष्ट दिवसापुरते मर्यादित न ठेवता ते सातत्याने आत्मसात करण्याची गरज आहे.
या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. जे. डी. हाटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख प्रा. डॉ. नितीन गायकवाड यांनी केले.
Post a Comment