डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते 'संवाद भारती' चे प्रकाशन
डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते 'संवाद भारती' चे प्रकाशन
सांगली -
डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली ने सुरु केलेल्या 'संवाद भारती' या द्वैमासिकाचे प्रकाशन भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री मा. ना. डॉ.विश्वजित कदम व मा. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
भारती विद्यापीठाची गुणवत्तेची परंपरा जोपासत महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या व समाजाच्या सर्वोत्कृष्ठ संस्कारक्षम विकासाठी सदैव प्रयत्नशील आहे. देशाची संस्कृती व परंपरा जोपासत आधुनिकतेची कास धरत अनेक अभ्यासपूरक उपक्रम राबवत आहे. हे उपक्रम जगभर पोहचावेत व सर्वांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने डिजीटल व्यासपीठावर संवाद भारतीची सुरवात करण्यात आली आहे.
संवाद भारती उपक्रम शिक्षण क्षेत्रात पथदर्शी असल्याचे मत डॉ.विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले. तसेच असे नाविन्यपूर्ण उपक्रम काळाची गरज असल्याचे खा.श्रीनिवास पाटील यांनी सांगितले.
यावेळी डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य आणि 'संवाद भारती' चे मुख्य संपादक डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालय नेहमी प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना व्यक्त होण्यासाठी 'संवाद भारती' सारखे नियतकालिक नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. या नियतकालिकाच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांशी सुसंवाद साधला जाणार आहे.
महाविद्यालयातील समाजाभिमुख विविध उपक्रम राबवीत असताना जगभरात समाजापर्यंत पोहचण्यासाठी व समाजातील सर्व घटकाशी अधिकाधिक संवाद वृद्धिंगत व्हावा या हेतूने संकल्पना राबवीत असल्याचे संपादक प्रा. जयश्री हाटकर, कार्यकारी संपादक अमोल वंडे यांनी सांगितले.
भारती विद्यापीठाच्या विविध शाखांचे शाखाप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी.कणसे यांनी केले. सूत्रसंचालन सूर्यकांत बुरूंग यांनी केले तर आभार मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम, कन्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही.वाय. कदम यांनी मानले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment