डॉ. पतंगराव कदम यांचे कर्तृत्व प्रेरणादायी : डॉ. डी.जी.कणसे
डॉ. पतंगराव कदम यांचे कर्तृत्व प्रेरणादायी : डॉ. डी.जी.कणसे
सांगली : सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून समाजहितासाठी धडाडीचे निर्णय घेणारे डॉ. पतंगराव कदम साहेब यांचे कर्तृत्व सर्वांना प्रेरणादायी ठरणारे आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले. येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम साहेबांनी शून्यातून विश्व निर्माण केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन भारती विद्यापीठासारख्या नामांकित संस्थेचा विस्तार देश-विदेशात केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी साहेब नेहमीच आग्रही होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हजारो विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी साहेबांनी माफ केली. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे आहे. मंत्रिमंडळात देखील शिक्षण राज्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, सेवायोजन उद्योग व जलसंधारण, वाणिज्य व व्यापार, सहकार पुनर्वसन व मदत कार्य मंत्री यांसारखी कॅबिनेट खाती मोठ्या आत्मविश्वासाने व समर्थपणे साहेबांनी सांभाळली आणि प्रत्येक खात्यावर स्वतःच्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांचे हे दैदीप्यमान कार्य सदैव स्मरणात राहण्यासारखे आहे.
या वेळी महाविद्यालयाचे कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. टी. आर. सावंत उपस्थित होते. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. नितीन गायकवाड, प्रा. जे. डी. हाटकर, प्रा. कृष्णा भवारी, डॉ. वर्षा कुंभार, प्रा. सतीश कांबळे, प्रा. नंदकुमार नाटके यांनी केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment