औद्योगिक क्षेत्रात नोकरीची संधी नेमकेपणाने शोधता आली पाहिजे : हिरेन कुलकर्णी
औद्योगिक क्षेत्रात नोकरीची संधी नेमकेपणाने शोधता आली पाहिजे : हिरेन कुलकर्णी
सांगली : भारतामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या नोकऱ्यांची उपलब्धता आहे. फक्त त्या नेमक्यापणाने शोधता आल्या पाहिजेत असे प्रतिपादन 'महिका'चे अधिकारी हिरेन कुलकर्णी यांनी केले. येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व 'महिका' मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 'पदवीधर मुलींना रोजगाराच्या संधी व क्षमता बांधणी' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, मुलींना आपल्या आवडीनुसार अनेक कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळू शकतात. तसेच कामाचे मर्यादित तास व सुरक्षिततेची हमी दिली जाते पण मुली या क्षेत्राकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. 'महिका' तर्फे महाविद्यालयातील विद्यार्थिनींमध्ये या माध्यमातून जाणीव जागृतीचे काम करण्यात येत आहे त्याचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना मार्गदर्शक अनुपमा रामटेके म्हणाल्या की, औद्योगिक क्षेत्रात नोकरी करायची असेल तर मुलींना कौशल्य विकास प्रशिक्षणाची अत्यंत गरज असते. आपण आत्मसात केलेल्या कौशल्याचे उपयोजन कसे करावे हे मुलींना माहीत नसते. 'महिका' तर्फे हे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी मुलींकडून मोबाईलवर काही प्रात्यक्षिकेही करून घेतली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. डी.जी. कणसे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय हे एक उपक्रमशील महाविद्यालय आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने महाविद्यालयात अनेक उपक्रम राबविले जातात. शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे काय? असा जेव्हा मुलांसमोर प्रश्न उभा राहतो तेव्हा 'महिका' सारखी प्रशिक्षण संस्था आमच्या विद्यार्थ्यांना नक्कीच उपयुक्त ठरेल.
या कार्यशाळेला महाविद्यालयाच्या विज्ञान विभाग प्रमुख प्रा.डाॅ. सौ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी.आर. सावंत उपस्थित होते. तसेच या कार्यशाळेत महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थीनी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन लेडीज असोसिएशनच्या प्रमुख प्रा. कु. भारती भाविकट्टी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.टी.आर. सावंत यांनी केले.
(Bharari Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment