नैसर्गिक गोष्टींकडे विज्ञानवादी दृष्टीकोनातून पाहावे : प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे
नैसर्गिक गोष्टींकडे विज्ञानवादी दृष्टीकोनातून पाहावे : प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाने घेतला शून्य सावली दिवसाचा अनुभव
जवळच्या व्यक्तींनी साथ सोडली तरीही माणसाची सावली मात्र कधीही त्याची साथ सोडत नाही असे म्हटले जाते. मात्र, दिनांक ७ मे, २०२२ रोजी दुपारी १२ वाजून १५ मिनिटे ते १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत सांगलीकरांच्या सावलीने त्यांची साथ सोडली होती. यावेळी सूर्य बरोबर डोक्यावर आला होता. भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, विज्ञान विभागप्रमुख डॉ. प्रभा पाटील, कला व वाणिज्य विभागप्रमुख श्री. टी. आर. सावंत, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी.पी.नाडे, प्रा. वाय. सी. धुळगंड,प्रा. एन. एन. नाटके तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून १२ वाजून १५ मिनिटे ते १२ वाजून २० मिनिटांदरम्यान शून्य सावलीचा अनुभूव घेतला. यावेळी प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले नैसर्गिक आपत्ती व त्यांचे उगम स्थान शोधणे काळाची गरज आहे म्हणून विद्यार्थ्यांनी सूर्याच्या हालचालींचा सखोल अभ्यास केला पाहिजे. पुढे ते म्हणाले अवकाशीय घटना आपल्या जीवनावर खूप परिणाम करतात . या कार्यक्रमाचे आयोजन भौतिकशास्त्र विभागाने केले होते.
डॉ. दादा नाडे या नैसर्गिक घटनेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, जे लोक अक्षांश २३.५ (कर्कवृत्त) आणि २३.५ (मकर वृत्त) म्हणजेच उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये राहतात, त्यांना वर्षातून एकदा नव्हे, तर दोन वेळा हा अनुभव घेता येतो. या दोन वृत्तांच्या दरम्यान एक असा दिवस येतो, की जेव्हा सूर्य आपल्या बरोबर डोक्यावर असतो. त्या वेळी कोणत्याही उभ्या वस्तूची अथवा माणसाची सावली बरोबर आपल्या खाली येते, जणू ती गायबच झालेली असते. पृथ्वी स्वतःभोवती परिभ्रमण करत असताना ती सूर्याभोवतीही फिरते. परंतु पृथ्वीचा परिभ्रमण अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून, तो २३.५ अंशांनी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात. पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याकडे झुकलेला असताना उत्तर गोलार्धात उन्हाळा तर दक्षिण गोलार्धात हिवाळा जाणवतो आणि पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याकडे झुकलेला असताना उत्तर गोलार्धात हिवाळा तर दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. दररोज सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची क्षितिजावरची जागा बदलत असते. साधारणतः २३ डिसेंबर रोजी सूर्याचे उत्तरायण तर २१ जून रोजी दक्षिणायण सुरू होते. त्यानंतर या दरम्यान दोन असे दिवस येतात की, ज्यावेळी मध्यान्ही सूर्य बरोबर डोक्यावर येतो व उभ्या वस्तूची सावली त्याच्या पायाखाली येते. हे दिवस वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असतात. सांगलीमध्ये साधारणपणे मे महिन्यात पहिल्या आठवड्यात व ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याचा अनुभव घेता येतो. हे दिवस अवकाश व वातावरण क्षेत्रामध्ये संशोधन करणाऱ्या संशोधकांसाठी खूप महत्वाचे असतात. पुढील शून्य सावली दिवस दिनांक ५ ऑगस्ट, २०२२ रोजी मध्यान्ही असून त्याचा अनुभव सर्वांनी घ्यावा व यासारख्या नैसर्गिक गोष्टींकडे विज्ञानवादी दृष्टीकोनातून पाहावे, असे आवाहन डॉ. नाडे यांनी केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment