Header Ads

Loknyay Marathi

भौतिक जगापेक्षा नैतिक जगाला पुढे घेऊन जाणे गरजेचे : प्रा.वैजनाथ महाजन

भौतिक जगापेक्षा नैतिक जगाला पुढे घेऊन जाणे गरजेचे : प्रा.वैजनाथ महाजन
सांगली : सामान्य माणसाच्या प्रामाणिकपणावरच भारताचे स्वातंत्र्य अवलंबलेले आहे. त्यामुळे भौतिक जगापेक्षा नैतिक जगाला पुढे घेऊन जाणे हेच खरे भारतीय स्वातंत्र्याचे औचित्य ठरेल असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन यांनी केले.
                    
येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'स्वातंत्र्योत्तर भारताची अमृत महोत्सवी वाटचाल' या विषयावरील व्याख्यानप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते.
        
पुढे बोलताना ते म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्योत्तर कालखंडात कृषी, शिक्षण, विज्ञान या सर्व क्षेत्रांमध्ये भारताचा विकास घडून येत आहे. शेती क्षेत्रामध्ये आज भारताने आमूलाग्र क्रांती केली असून दुसऱ्या देशाला तो धान्य निर्यात करू शकतो इतका प्रगत झालेला आहे. भारतीय लोकांच्यामध्ये चारित्र्याचा स्रोत प्रामाणिक असायला हवा. आजच्या तरुणांमध्ये स्वप्ने पेरून ती सत्यात उतरवण्याची गरज आहे. उद्याची पिढी अधिक सक्षम होण्यासाठी त्यांच्यात नैतिक मूल्ये रुजवणे गरजेचे आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत सांगली जिल्ह्यातील क्रांतिकारकांचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
        
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. डी जी. कणसे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपल्याला स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाकडे, देशाप्रती त्यांनी दिलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अनेक क्रांतिवीरांनी आपल्या मातृभूमीसाठी रक्त सांडले, प्राणाचे बलिदान दिले म्हणूनच आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत.
       
स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. टी. आर. सावंत यांनी केले. तर आभार सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. नितीन गायकवाड यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. वर्षा कुंभार यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. जयश्री हाटकर, प्रा. सतीश कांबळे, प्रा. नंदकुमार नाटके, प्रा. नरेश पवार यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)