अहिंसा हा मानवाचा स्थायीभाव असावा : प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे
अहिंसा हा मानवाचा स्थायीभाव असावा : प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे
सांगली : 'प्रत्येक प्रश्न हे आक्रमक होऊन सुटत नाहीत तर सहनशीलतेनेही अनेक प्रश्न मार्गी लागतात. महात्मा गांधीजींनी जगाला शांततेची आणि अहिंसेची शिकवण दिली. त्याचे आचरण केल्यामुळे मानवाला आत्मसन्मान प्राप्त झाला. समाजाचा विकास घडवून आणायचा असेल तर अहिंसा हा मानवाचा स्थायीभाव असला पाहिजे.' असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले. येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रतिमा पूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'मानवता हे एक श्रेष्ठ मूल्य असून त्याला सत्य व अहिंसेची जोड मिळाली तर सामाजिक स्थैर्य अधिक बळकट होईल. महात्मा गांधीजींचे हे विचार आजही जागतिक स्तरावर सर्वमान्य आहेत. त्याचबरोबर खेड्याकडे चला, स्वदेशीचा पुरस्कार, साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे ते पुरस्कर्ते होते. त्यांनी अहिंसेचा अर्थ जगाला सांगितला म्हणून त्यांचा जन्म दिवस हा 'जागतिक अहिंसा दिन' म्हणून साजरा केला जातो.
लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी बोलताना डॉ. कणसे म्हणाले की, लालबहादूर शास्त्री यांच्या अंगी नमता, दृढता व जबरदस्त आंतरिरक इच्छाशक्ती होती म्हणून ते जनमानसात लोकप्रिय होते. आजच्या तरूणांनी शास्त्रींच्या अंगी असलेले हे गुण आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यांचा 'जय जवान, जय किसान !' हा नारा आजही देशासाठी प्रेरणादायी आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत सांगलीवाडी परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाच्या कला व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. टी. आर. सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. नितीन गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास आवळे, डॉ. रुपाली कांबळे, प्रा. एस. डी. पाकले यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment