डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात रोजगार कौशल्य व संधी या विषयावर कार्यशाळेचे आयोजन
डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात 'रोजगार कौशल्य व संधी' या विषयावर कार्यशाळेचे आयोजन
सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात करिअर कौन्सिलींग ॲन्ड प्लेसमेंट सेल, अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग व महिंद्रा प्राईड क्लासरूम यांच्या संयुक्त विद्यमाने 'रोजगार कौशल्य व संधी' या विषयावर सहा दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ महाविद्यालयाच्या सभागृहात नुकताच संपन्न झाला. या प्रसंगी महिंद्रा कंपनीचे अधिकारी प्रा .डॉ. दीपक देवकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. देवकर म्हणाले की, 'नांदी फाउंडेशन ही एक सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत भारतात अनेक ठिकाणी महाविद्यालयीन तरुणांना मोफत प्रशिक्षण दिले आहे. विद्यार्थ्याने पदवी संपादन केल्यानंतर ज्या वेळी तो नोकरीच्या शोधात फिरतो त्यावेळी तो केवळ पात्र असतो पण तो रोजगारक्षम असतोच असे नाही. त्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य, वेळेचे नियोजन, ज्ञान, उपयोजन इत्यादी गोष्टींची माहिती होणे गरजेचे असते. म्हणून सहा दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना यांचा चांगला उपयोग होईल. आतापर्यंत महिंद्रा कंपनीने दोन लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यापैकी पंचाहत्तर टक्के विद्यार्थी नोकरी करत आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. कणसे म्हणाले की,'कोणताही उद्योग असो अथवा व्यवसाय, त्यासाठी कौशल्य आत्मसात केल्याशिवाय आपण यशस्वी होत नाही. अशा प्रकारच्या प्रशिक्षणातून आपल्याला मिळालेली नोकरीची संधी कायम टिकवण्यास मदत होते. आजच्या स्पर्धेच्या युगात आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी बौद्धिक क्षमता वाढवण्याची गरज आहे.
ही कार्यशाळा तृतीय वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थीनींसाठी आयोजित केली आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा .डॉ . ए. एम. सरगर यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. शिल्पा साळुंखे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.सौ. रोहिणी वाघमारे यांनी केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment