सामाजिक शास्त्रांचे अंतिम ध्येय मानवकेंद्रीत असावे : डॉ. भारती पाटील
सामाजिक शास्त्रांचे अंतिम ध्येय मानवकेंद्रीत असावे : डॉ. भारती पाटील
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद संपन्न
सांगली : 'जागतिकीकरणामुळे तंत्रज्ञानाचा विकास, प्रचार आणि प्रसार झपाट्याने झाला. त्यामुळे मानवी जीवनात अमुलाग्र बदल झाला. अशा परिस्थितीत मानवी जीवन नीट समजून घेऊन, ते अधिक नैतिक कसे होईल याचा विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक सामाजिक शास्त्राचे अंतिम ध्येय हे मानवकेंद्रीत असले पाहिजे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या माजी सदस्या व राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रा. (डॉ.) भारती पाटील यांनी केले.'
येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात 'सामाजिकशास्त्र आणि भाषाशास्त्र यातील समकालीन समस्या' या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या बीजभाषणप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठाचे विभागीय मानद संचालक डॉ. एच. एम. कदम होते. यावेळी व्यासपीठावर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन डॉ. सिकंदर जमादार, शिवाजी विद्यापीठाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. (डॉ.) प्रकाश पवार, डॉ. भरत जाधव, प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. भारती पाटील म्हणाल्या की, 'सामाजिक शास्त्रांची उत्पत्ती ही इसवी सनापूर्वी चौथ्या शतकात झाली असली तरी प्रबोधन काळात खऱ्या अर्थाने त्याचा विकास झाला. नव्या क्रांतीनंतर विषमता, नैसर्गिक साधनसंपत्ती, पर्यावरण, तंत्रज्ञान यांमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या वाढत गेल्या. त्याचाच परिणाम आज व्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले आहे. व्यक्ती स्वतःची ओळख विसरून समुहाची ओळख करू पाहात आहे. सामाजिकशास्त्र आणि भाषाशास्त्राच्या माध्यमातून या समस्यांचे निराकरण व्हायला हवे.' या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, 'सद्य:स्थितीमध्ये आपल्या देशात ज्या सामाजिक आणि भाषिक समस्या निर्माण होतात त्या समस्या देशाच्या आर्थिक विकासात अडथळा ठरत आहेत. त्यावर योग्य वेळी उपाययोजना होणे गरजेचे आहे.' अध्यक्षीय भाषणात डॉ. एच. एम. कदम यांनी सामाजिकशास्त्र आणि भाषाशास्त्र ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे परस्परांशी संबंधित असणाऱ्या या दोन्ही घटकांवर विविधांगी चर्चा होऊन त्यातून समाजोपयोगी बदल घडले तरच आजच्या चर्चासत्राचा उद्देश साध्य होईल असेही ते म्हणाले.
द्वितीय सत्रात डॉ. प्रकाश पवार यांनी सामाजिकशास्त्र आणि भाषाशास्त्र यांचे शिकविले जाणारे सिद्धांत आजच्या जीवनाशी निगडित असण्याची गरज स्पष्ट केली. त्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची सवय लावली पाहिजे असे त्यांनी सांगितले. वा तृतीय सत्रात डॉ. भरत जाधव यांनी मराठी भाषाशास्त्रातील अनेक समस्यांवर भाष्य केले. त्याचबरोबर त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजेत यावरही मार्मिक टिप्पणी केली.
या परिषदेत डॉ. सिकंदर जमादार, डॉ. ऊर्मिला क्षीरसागर यांनी सत्राध्यक्ष म्हणून मनोगत व्यक्त केले. समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. एस. एस. शेजाळ यांनी नव्या शैक्षणिक धोरणाच्या परिणामांचे गांभीर्य लक्षात आणून दिले. या परिषदेत प्रातिनिधिक स्वरूपात डॉ. संतोष खडसे, प्रा. गौरी देसाई आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. परिषदेसाठी सत्तरहून अधिक शोधनिबंधांसह १०७ प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. या परिषदेचे औचित्य साधून शैक्षणिक योगदानाबद्दल डॉ. भारती पाटील यांना महाविद्यालयातर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या सन्मानपत्राचे वाचन प्रा. (डॉ.) शिवाजी बोऱ्हाडे यांनी केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. तानाजी सावंत यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. भारती भाविकट्टी यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. वंदना सातपुते यांनी केले, तर या चर्चासत्राचे संयोजन प्रा. सतीश कांबळे, प्रा. अमोल कुंभार यांनी केले.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment