डॉ. पतंगराव कदम साहेबांनी महाराष्ट्राच्या उद्धारासाठी कार्य केले : डॉ. इंद्रजित मोहिते
डॉ. पतंगराव कदम साहेबांनी महाराष्ट्राच्या उद्धारासाठी कार्य केले : डॉ. इंद्रजित मोहिते
सांगली : इतिहासाचे अवलोकन करून वर्तमानाचा अभ्यास करताना भविष्य घडविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या डॉ. पतंगराव कदम साहेबांनी अखेरच्या श्वासापर्यंत महाराष्ट्राच्या उद्धारासाठी तन,मन, धन अर्पण करून समाजकार्य केले असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी केले. येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, भारती विद्यापीठ सांगली विभागीयचे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. डी. जी. कणसे, डॉ. नितीन नाईक, डॉ. कमला साळुंखे, महाविद्यालयातील माजी प्राध्यापक राम पवार, डॉ. एच. एम. पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजीराव बोऱ्हाडे, डॉ. अमित सुपले, प्रा. टी. आर. सावंत, प्रा. अरूण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. पतंगराव कदम यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त 'आठवणीतले डॉ. पतंगराव कदम साहेब' या विषयावर बोलताना मोहिते पुढे म्हणाले की, 'शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि ज्ञानाशिवाय परिवर्तन नाही हे विचार पतंगराव कदम साहेबांनी आत्मसात केले होते. म्हणून शिक्षणाबरोबरच राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात धडाडीचे निर्णय घेऊन महाराष्ट्र आणि देशभरात त्यांनी आपल्या कार्याची छाप पाडली. त्यांच्याकडे मित्रता, बंधूता व प्रेमाची ताकद होती म्हणून ते सर्वांना गुरुस्थानी होते.' डॉ. पतंगराव कदम यांच्या विषयी आठवणी सांगताना मोहिते यांनी आपल्या भाषणात कबीराच्या दोह्यांचा दाखला दिल्यामुळे उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. माणिकराव साळुंखे लाभले होते. आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, समाजवादी विचारसरणी जोपासणाऱ्या डॉ.पतंगराव साहेबांच्या दृष्टीत सामान्य माणूस नेहमीच केंद्रस्थानी राहिला. शिक्षणाचे मर्म त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेतून उमगले म्हणून भारती विद्यापीठ या आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षण संस्थेची त्यांनी निर्मिती केली. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कार्याचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर पडल्याचे दिसून येते. साहेबांच्या प्रत्येक कामात दूरदृष्टीपणा होता. त्यांच्या कार्याचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे असेही आवाहन त्यांनी या वेळी केले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. डी. जी. कणसे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. शिल्पा साळुंखे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. शिवाजीराव बोऱ्हाडे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, सांगलीवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment