डॉ. पतंगराव कदम हे खऱ्याअर्थाने परिवर्तनाचे वाटसरू : डॉ. डी.जी.कणसे
डॉ. पतंगराव कदम हे खऱ्याअर्थाने परिवर्तनाचे वाटसरू : डॉ. डी.जी.कणसे
सांगली : 'वयाच्या १८ व्या वर्षी भारती विद्यापीठ ही आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण संस्था स्थापन करून समाजाच्या तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याचे महत्कार्य डॉ. पतंगराव कदम साहेबांनी केले आहे. शिक्षणामुळेच समाजात परिवर्तन होते ही त्यांची दृढ धारणा होती. म्हणून पतंगराव कदम यांनी सर्वप्रथम शिक्षणाला महत्त्व दिले. काळाची पावले ओळखून त्यांनी महत्त्वपूर्ण आणि धडाडीचे निर्णय घेऊन देश-विदेशात अनेक शैक्षणिक संकुलं उभारली. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज शिक्षण, उद्योग, व्यवसायाला चालना मिळाली आहे. मोठ्या प्रमाणात सामाजिक बदल झालेला आहे. म्हणून डॉ. पतंगराव कदम हे खऱ्याअर्थाने परिवर्तनाचे वाटसरू होते.' असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे यांनी केले. येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या डॉ.पतंगराव कदम साहेब यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या प्रसंगी बोलताना ते म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम साहेबांनी शून्यातून विश्व निर्माण केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतः शिक्षण घेतले. याची जाणीव म्हणून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हजारो विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी साहेबांनी माफ केली. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे आहे. मंत्रिमंडळात देखील शिक्षण राज्यमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, सेवायोजन उद्योग व जलसंधारण, वाणिज्य व व्यापार, सहकार पुनर्वसन व मदत कार्य मंत्री यांसारखी कॅबिनेट खाती मोठ्या आत्मविश्वासाने व समर्थपणे साहेबांनी सांभाळली आणि प्रत्येक खात्यावर स्वतःच्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांचे हे देदीप्यमान कार्य सदैव स्मरणात राहण्यासारखे आहे.
या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजीराव बोऱ्हाडे, डॉ.अमित सुपले, ज्येष्ठ प्राध्यापक टी. आर. सावंत, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा. अरुण जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. नितीन गायकवाड, डॉ. वर्षा कुंभार, प्रा. सतीश कांबळे, प्रा. नंदकुमार नाटके यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment