Header Ads

Loknyay Marathi

प्रशासकीय कामात निष्ठा जोपासणे आवश्यक : डॉ. एम. एस. सगरे

प्रशासकीय कामात निष्ठा जोपासणे आवश्यक : डॉ. एम. एस. सगरे


डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात प्रशासकीय कौशल्ये प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन


सांगली : शैक्षणिक विश्वातील प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सेवकांनी विविध प्रकारची गुणकौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. व्यक्तिमत्वातले दोष दूर करून विद्यार्थी, पालक यांच्या अडचणी व गरजा समजावून घेतल्या पाहिजेत. प्रत्येकाला अनेक अडचणी येतात पण त्यातून निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. जो प्रशासक म्हणून काम करतो त्याला अधिकार दिला पाहिजे. सहकार्याची भूमिका ठेवून संस्थेप्रति सेवकांनी निष्ठा जोपासणे आवश्यक आहे असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. एम. एस. सगरे यांनी केले.


येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात प्रशासकीय कौशल्ये प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठाचे विभागीय मानद संचालक डॉ. एच. एम. कदम होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप पाटील, प्रा. डॉ. मिलिंद देशमुख, शिवाजी विद्यापीठ परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. जी. आर. पळसे, श्री. पी. एस. पांडव, श्री. जयवंत आवटे, प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, उपप्राचार्य डॉ. शिवाजीराव बोऱ्हाडे, प्रा. टी. आर. सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
       
पुढे बोलताना डॉ. सगरे म्हणाले की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होणार आहेत, त्यासाठी सेवकांनी स्वतःला अद्यावत ठेवायला हवे. 
         
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, महाविद्यालयामध्ये प्रशासकीय काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रत्येकाने आपले काम नियोजनबद्ध पद्धतीने केले पाहिजे. भारती विद्यापीठांमध्ये अनेक होतकरू व निष्ठेने काम करणारे प्रशासकीय सेवक आहेत. त्यांनी डॉ. पतंगराव कदम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला हवा.
       
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ज्या व्यक्तीकडे सृजनशीलता असते त्या व्यक्ती चांगले काम करतात. काम करणारा माणूस हा किती संवेदनशील आहे यावर त्याच्या कामाचे स्वरुप अवलंबून असते. ज्या संस्थेत काम करतो त्याबद्दल निष्ठा,प्रामाणिकपणा, कमी होऊ द्यायचा नाही. प्रशासनात आपण स्वतः प्रसन्न असणे महत्वाचे आहे. माणूस म्हणुन सर्वांची गुणवत्ता सारखी असते. त्यासाठी सर्वांना समजून घेणे महत्वाचे असते. संवाद हा ताणतणाव कमी करण्याचा मार्ग आहे.
      
शिवाजी विद्यापीठ परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ.जी.आर.पळसे यांनी विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरील समाधान हाच प्रशासनातला आनंद असतो. त्यामुळे विद्यार्थ्याला मुख्य केंद्रस्थानी समजले पाहिजे असे मत मांडले.
      
प्रा. डॉ. मिलिंद देशमुख मार्गदर्शन करताना म्हणाले की, स्वतःहून केलेल्या कामातून कधीही ताणतणाव येत नाही. त्यामुळे काम कधीही टाळू नये.
        
शिवाजी विद्यापीठ उपकुलसचिव पी. एस. पांडव यांच्या मतानुसार प्रामाणिक व निष्ठेने काम केल्यास त्याचे फळ चांगले मिळते. कथाकार श्री. जयवंत आवटे यांनी प्रशासकीय कामात सहकार्याची भूमिका अधोरेखित करून सावली या कथासंग्रहातील आई वडिलांचे महत्त्व विशद केले.
      
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक श्री. दत्तात्रय मोहिते यांनी केले. सूत्रसंचालन श्री. शहाजी कापसे व सौ. अरुणा सूर्यवंशी यांनी केले. तर आभार सौ. आशा मदने यांनी मानले. या कार्यशाळेत शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १८७ सेवक प्रतिनिधींनी आपला सहभाग नोंदविला.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)