Header Ads

Loknyay Marathi

आईविना पोरकी : आजी आजोबा करतात सांभाळ: प्रतिकूल परिस्थितीत सुप्रियाचे यश

आईविना पोरकी : आजी आजोबा करतात सांभाळ: प्रतिकूल परिस्थितीत सुप्रियाचे यश


सांगलीवाडीच्या मुलीचे सर्वत्र कौतुक. महाविद्यालयात प्रथम क्रमांक

सांगली: शेतमजुरी करणारी आजी आजोबा यांची नात कु. सुप्रिया दत्तगुरु आंबी हिने बारावी परीक्षेत महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान तर मिळवलाच परंतु एच. एस. सी. होकेशनल विभागाच्या मेडिकल लॅब टेक्निशियन या शाखेतून ९१.३३ टक्के गुण मिळवून महाविद्यालयाचे नाव देखील उंचावले. या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात शिकणारी कष्टकरी कुटुंबातील सुप्रिया हिने बारावीच्या एच.एस. सी. व्होकेशनल शाखेतून ६०० पैकी ५४८ गुण मिळवले. सुप्रिया लहान असतानाच आई देवाघरी गेली. वडील व्यसनामुळे घराकडे फारसे लक्ष देत नाहीत. तेव्हा आजी आजोबा दोघे शेतमजुरी करून या दोन्ही भावंडांना सांभाळतात. सुप्रियाने कोणतीही खाजगी शिकवणी न लावता, कोणतेही सोशल ऑनलाइन मटेरियल, मोबाईल उपलब्ध नसताना एवढेच नाही तर कोणतेही पुस्तक विकत घेण्याची परिस्थिती नसताना देखील हे यश मिळवले. सुप्रियाची जिद्द चिकाटी पाहून महाविद्यालयाच्या प्रशासकीय सेवक सौ. अरुणा सूर्यवंशी व विशाल पवार यांनी तिला मदतीचा हात दिला. तिच्या प्रवेशापासून ते अभ्यासासाठी लागणारे सर्व साहित्याचा खर्च सौ. सूर्यवंशी यांनी केला. तिचे वर्गशिक्षक डॉ. सपकाळ सर व विभागप्रमुख प्रा. ए. एल. जाधव सर यांनी देखील तिला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.जी. कणसे यांनी देखील तिच्या या यशाचे कौतुक केले व पुढील प्रवेशासाठी सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. महाविद्यालयात प्रथम येऊन या सर्वांचा विश्वास तिने सार्थ केला आहे. सुप्रियाची सायन्स पदवी घेऊन पुढे DMLT करून वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची इच्छा आहे. सुप्रियाच्या स्वप्नपूर्तीसाठी तिचा भाऊ देखील कष्ट करतो. त्याने देखील बाहेर काम करत बारावी मध्ये ७७ टक्के मार्क्स मिळवले आहेत. सुप्रिया देखील घरी न बसता सद्या मेडिकल लॅब मधे नोकरी करते. जिद्दीने अभ्यास केल्यावर खरोखरच मुली यशाचे शिखर गाठतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आजोबा आणि आजी यांच्या मेहनतीवर घराची चूल पेटते. अशा परिस्थितीतही सुप्रियाने जिद्द सोडली नाही परिस्थितीशी दोन हात करत तिने हे यश संपादन केले. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाकडून तिचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)