Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी


सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात समाजपरिवर्तनाचे माध्यम ठरले. अनेक भारतीय भाषांमध्ये तसेच जगभरातील भाषांमध्ये त्यांचे साहित्य भाषांतरित झाले आहे. या प्रतिभावंत साहित्यिकाने खऱ्याअर्थाने आपल्या साहित्य लेखनातून समाजाला जगण्याची नवी उमेद दिली, क्रांतिकारी विचार दिला म्हणून त्यांना लोकशाहीर या नावाने ओळखले जाते.
           
लोकमान्य टिळक यांच्या विषयी बोलताना कणसे म्हणाले की, लोकमान्य टिळक यांचा स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग होता. समाजिक ऐक्य निर्माण ककरण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. लोकमान्य टिळक हे महान क्रांतिकारी समाजसुधारक, शिक्षक, वकील तर होतेच पण ते एक मोठे लेखक देखील होते. ते जहाल मतवादी विचारसरणीचे होते. आक्रमकता आणि निर्भीड वृत्तीमुळे त्यांनी इंग्रज सरकारला धारेवर धरले होते. 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हणून त्यांची संपूर्ण भारतात आजही ख्याती आहे. या दोन्ही महापुरुषांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन त्यांचे स्मरण करणे गरजेचे आहे. 
      
यावेळी महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. शिवाजीराव बोऱ्हाडे, डॉ. अमित सुपले, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. तानाजी सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने केले होते. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)