Header Ads

Loknyay Marathi

क्वालिटी, पॉलिसी व झिरो डिफेक्ट यामुळेच चांद्रयान 3 चे यशस्वी प्रक्षेपण : स्वप्निल पाठक

क्वालिटी, पॉलिसी व झिरो डिफेक्ट यामुळेच चांद्रयान 3 चे यशस्वी प्रक्षेपण : स्वप्निल पाठक


सांगली:  'चांद्रयान-3, आदित्य एल-1 यांचे यशस्वी प्रक्षेपण झाल्यामुळे इस्रोचे जगभरातून कौतुक होत आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेमागे  अनेक दृश्य-अदृश्य हात आहेत. अनेक वर्षांच्या परिश्रमातून हे यश मिळाल्यामुळे याचा आनंद विशेष आहे.  क्वालिटी, पॉलिसी व झिरो डिफेक्ट यामुळेच हे शक्य झाले.' असे प्रतिपादन इस्रोचे वैज्ञानिक स्वप्नील पाठक यांनी केले.  येथील भारती विद्यापीठाच्या डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात  'चांद्रयान 3 मिशन मून ऑफ इंडिया' या विषयावर भूगोल विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.  पुढे बोलताना पाठक म्हणाले की, भारतीय वैज्ञानिकांनी सखोल अभ्यास व चिकाटी यातून यश संपादन केले. त्यामुळे समस्त भारतवासीयांना ही अभिमानाची बाब आहे. या घटनेमुळे आज संपूर्ण जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे. 
           
या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते. आपल्या मनोगतात ते म्हणाले की, भारतीय वैज्ञानिकांनी केलेली ही कामगिरी अत्यंत मोलाची आहे. विकसनशील देश म्हणून भारताची ओळख असली तरी इतर देशांच्या तुलनेत भारताने मिळवलेले हे यश अनन्यसाधारण आहे.  आयुष्यात अपयश आले तर  खचून न जाता पुन्हा उभारी घेतली पाहिजे असे भारतीय वैज्ञानिकांनी या घटनेतून जगाला दाखवून दिले.
          
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजीराव बोऱ्हाडे, नॅक समन्वयक व उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. अरूण जाधव उपस्थित होते. 
       
सदर कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. नितीन गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रोहिणी वाघमारे यांनी केले तर आभार डॉ. महेश कोल्हाळ यांनी मानले. या चर्चासत्राला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)