वाचन संस्कृती समाजाच्या विकासासाठी ठरते पोषक : डॉ. राजपूरे
वाचन संस्कृती समाजाच्या विकासासाठी ठरते पोषक : डॉ. राजपूरे
सांगली : 'वाचन माणसाचे विचार समृद्ध करते. विचारांची खोली माणसाची उंची वाढवते. पर्यायाने वाचन संस्कृती समाजासाठी पोषक ठरत असते.' असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठातील भौतिक शास्त्राचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. के. वाय. राजपूरे यांनी केले. येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ते बोलत होते. बोलताना पुढे ते म्हणाले की, 'डाॅ. कलाम हे वाचनाने प्रेरित झालेले व्यक्तिमत्त्व होते. म्हणून त्यांची जयंती ही वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते. वाचनाने माणूस समृद्ध कसा होतो हे त्यांनी आपल्या आचार विचारांतून सिद्ध केले आहे. त्यांचा वैचारिक वारसा आजच्या तरुणांनी जोपासणे आवश्यक आहे.'
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे उपस्थित होते. आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. कणसे म्हणाले की, 'मोबाईलच्या व्यसनापासून दूर रहा आणि पुस्तकांशी मैत्री करा. अवांतर वाचनाने माणूस समृद्ध होतो. महापुरुषांच्या चरित्र वाचनातून त्यांच्या कार्याची आपल्याला प्रेरणा मिळते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी अविरतपणे देशसेवा केली. मुलांप्रती त्यांचे निस्सीम प्रेम होते. मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे असे ते नेहमी म्हणायचे. 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. कलाम यांच्या कार्याची प्रेरणा सर्वांनी घेणे गरजेचे आहे.'
या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, प्रा. टी. आर. सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन व स्वागत ग्रंथपाल प्रा. जयश्री हाटकर प्रास्ताविक डॉ. दादा नाडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रोहिणी वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. एन.एन. नाटके यांनी मानले. या वेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment