ज्ञानात्मक संस्कृती निर्माण करणे हे साहित्याचे मुख्य ध्येय : डॉ. श्रीपाल सबनीस
ज्ञानात्मक संस्कृती निर्माण करणे हे साहित्याचे मुख्य ध्येय : डॉ. श्रीपाल सबनीस
सांगली : विश्व मानवतेच्या कल्याणासाठी शांतता, मूल्यात्मक विकास आणि ज्ञानात्मक संस्कृती निर्माण करणे हे साहित्याचे मुख्य ध्येय असले पाहिजे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात डॉ. पतंगराव कदम यांच्या जयंती निमित्त व भारती विद्यापीठाचे कार्यवाह व महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सहाव्या ज्ञानभारती मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी स्वागताध्यक्षा विजयमाला कदम, संमेलनाध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील, आमदार डॉ. विक्रम सावंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन पर भाषणात सबनीस पुढे म्हणाले की, विचारांची अभिव्यक्ती होण्यासाठी समाजामध्ये आज स्वच्छ आणि निकोप वातावरण दिसत नाही. आपल्याला नवीन विश्वात्मक संस्कृती निर्माण करायची असेल तर संकुचित विचार करून चालणार नाही. संत ज्ञानेश्वरांनी 'हे विश्वची माझे घर' हा व्यापक संदेश समाजाला दिला. ही विश्वसंस्कृती निर्माण करणे साहित्यिकांची जबाबदारी आहे. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. प्रदीप पाटील म्हणाले की, 'डॉ. पतंगराव कदम साहेब यांचे शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्य त्यांचे कर्तृत्व सिद्ध करते. माणसं जोडण्याची आणि ती टिकवून ठेवण्याची कला त्यांनी अवगत केली होती. मराठी साहित्य आणि साहित्यिक यांच्या विषयी त्यांच्या मनात नेहमी आपुलकी असायची.
पुस्तक वाचल्याने खऱ्या आयुष्याची ओळख होते. आपल्या व्यक्तीमत्त्वात काय कमी आहे ते साहित्यवाचनातून आत्मसात केले जाते. संस्काराची शिदोरी आपल्याला साहित्यातून मिळते. त्यामुळे भविष्यात सुजाण नागरिक घडण्यास मदत होते. असे मत यावेळी विजयमाला कदम यांनी व्यक्त केले. तर आमदार विक्रम सावंत हे डॉ. पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले की, साहेबांनी खऱ्या अर्थाने समाज परिवर्तन घडविण्याचे कार्य केले. माणसातील माणूसपण शोधण्याचा प्रयत्न केला आणि आत्मभान देण्याचे कार्य केले.
एक दिवसीय या साहित्य संमेलनात कवी रमजान मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कवी संमेलनात सुनंदा शेळके, नितीन चंदनशिवे, वसंत पाटील, दयासागर बन्ने, लता ऐवळे यांनी बहरदार रचना सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तर आप्पासाहेब खोत आणि विजयराव जाधव यांनी आपल्या खुमासदार शैलीत कथाकथन करून श्रोत्यांची मने जिंकली. संमेलनाचा समारोप सुभाष कवडे यांच्या भाषणाने झाला.
या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. सूर्यकांत बुरुंग यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. भारती भाविकट्टी यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी व सांगली शहरातील रसिक, श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment