आधुनिकता ही केवळ साधनांमध्ये नको तर तुमच्या विचारांमध्येही पाहिजे : संजय आवटे
आधुनिकता ही केवळ साधनांमध्ये नको तर तुमच्या विचारांमध्येही पाहिजे : संजय आवटे
सांगली: आजच्या तरुणाईच्या हातात आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. परंतु आधुनिकता केवळ तुमच्या साधनांमध्ये असून चालणार नाही तर तुमच्या विचारांमध्येही असली पाहिजे. विचार केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही असे प्रतिपादन लोकमतचे संपादक संजय आवटे यांनी केले. येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात भारती विद्यापीठ, पुणे आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, पुणे यांच्यावतीने डॉ. पतंगराव कदम स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. या वेळी भारती विद्यापीठ सांगली विभागाचे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. डी. जी. कणसे, डॉ. लिमये, डॉ. सौ. नीलिमा भोरे, डॉ. पल्लवी जामसांडेकर, महाविद्यालयातील माजी प्राध्यापक डॉ. एम. एच. पाटील, प्रा. टी. आर. सावंत तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, प्रा. अरूण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. पतंगराव कदम यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त 'तरुणाईचा भारत' या विषयावर बोलताना आवटे पुढे म्हणाले की, सांगली जिल्ह्याचा इतिहास पाहिल्यास आपल्या असे लक्षात येते की, सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुष्काळ असायचा लोकांना प्यायला पाणी नव्हते, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असे, शिक्षणाची वानवा होती परंतु आज तोच परिसर समृद्ध झाला आहे. श्रीमंत झाला आहे. गरिबा घरची मुलं शिकू लागली, लाखो तरुणांना रोजगार मिळाला याचे कारण डॉ. पतंगराव कदम. आजच्या तरुणाने परिवर्तनवादी महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वयंपूर्ण भारत घडविण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्यासाठी प्रथम भारताची संस्कृती समजून घेतली पाहिजे, भारताचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. या देशाचे वैशिष्ट्य काय आहे, वेगळेपण काय आहे हे समजून घेतले पाहिजे. आज जाणीवपूर्वक नव्या पिढीला इतिहास सांगितला जात नाही किंवा जाणीवपूर्वक चुकीचा इतिहास शिकविला जातो पण या तरुणाईने सदसद्विवेकबुध्दी जागृत ठेवून स्वतंत्र विचार करायला शिकले पाहिजे. व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस केले पाहिजे. उद्याचा भारत तुमच्या हातात सुरक्षित राहील असे परिवर्तन करण्याची गरज आहे. म्हणून शाहू, फुले, आंबेडकरांचा संघर्ष डोळ्यापुढे ठेवून कोणत्याही एका जातीच्या, धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस होणे फार महत्त्वाचे आहे.' या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजय आवटे यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील काही आठवणी सांगितल्या त्यामुळे उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. एच. एम. कदम लाभले होते. आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, डॉ. पतंगराव कदम यांच्या कार्याचा आदर्श तरुण पिढीने घेतला पाहिजे. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रात बदल घडवून आणण्याची क्षमता आजच्या तरूणांमध्ये दिसून येते. भारती विद्यापीठाने आजपर्यंत समाज घडवण्याचे कार्य केले. डॉ. पतंगराव कदम यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपणही समाज परिवर्तनाचे माध्यम बनले पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सूर्यकांत बुरुंग यांनी केले, पाहुण्यांचा परिचय डॉ. भरत बल्लाळ यांनी केला तर आभार प्रदर्शन डॉ. सौ. नीलिमा भोरे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयांतील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि सांगली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment