डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात मंगळवारी सहावे ज्ञानभारती मराठी साहित्य संमेलन
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात मंगळवारी सहावे ज्ञानभारती मराठी साहित्य संमेलन
सांगली: भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती व महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त व भारती विद्यापीठाचे कार्यवाह, महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात मंगळवार दि. ९ जानेवारी २०२४ रोजी सहाव्या ज्ञानभारती मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या साहित्य संमेलनाचे उद्घाटन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते होणार असून कवी प्रदीप पाटील हे संमेलनाध्यक्ष तर मा. विजयमाला कदम ह्या स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी रसिक, श्रोत्यांना उपस्थित मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर दुपारच्या सत्रात निवडक निमंत्रित कवींचे कवी संमेलन आणि कथाकथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनातला सांगली जिल्हा काँग्रेस आय कमिटीचे अध्यक्ष व जत विधानसभेचे आमदार मा. विक्रम सावंत, भारती विद्यापीठाचे सांगली विभागीय संचालक मा. डॉ. एच. एम. कदम, ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सदरच्या साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील ख्यातनाम कथाकथनकार प्रा. आप्पासाहेब खोत व विजयराव जाधव यांचे कथाकथन होणार असून सुप्रसिद्ध कवी रमजान मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली कवयित्री प्रा. डॉ. सुनंदा शेळके, प्रा. लता एवळे, वसंत पाटील, नितीन चंदनशिवे, दयासागर बन्ने या निवडक निमंत्रित कवींचे कवी संमेलन होणार आहे असे महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. कणसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वर्षीचे संमेलन हे सर्वांसाठी खुले असून साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. कणसे यांनी केले आहे. यावेळी डॉ. अमित सुपले, डॉ. कृष्णा भवारी, प्रा. ए. एल. जाधव, प्रा. सतीश कांबळे आदी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment