Header Ads

Loknyay Marathi

तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे, आपण तंत्रज्ञानासाठी नाही : डॉ. नेहा जोशी

तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे, आपण तंत्रज्ञानासाठी नाही : डॉ. नेहा जोशी


सांगली : 'आज माणसं मिडिया आणि तंत्रज्ञानाच्या आहारी इतकी गेली आहेत की, तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे की आपण तंत्रज्ञानासाठी आहोत याचा विसर त्यांना पडला आहे' अशी खंत  डॉ. नेहा जोशी यांनी व्यक्त केली. येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय अंतर्गत 'Code of Conduct and Human Values' या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातक असतो. आज आबालवृद्ध मोबाईलचा वापर आवश्यकतेपेक्षा  जास्त करत आहेत. यामुळे वेळेचा अपव्यय होतो, शारीरिक, मानसिक आरोग्यही धोक्यात येते. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांचे वाचनाकडे आणि मैदानी खेळांकडे दुर्लक्ष झाले आहे. पारंपरिक शिक्षणपद्धतीत आणि आधुनिक शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. महाविद्यालयाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून विद्यार्थ्यांनी आपला व्यक्तिमत्त्व विकास साधला पाहिजे.

कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात डॉ. बी. एस. जाधव यांनी उपस्थितांना  'मानवी जीवनात स्वयंशिस्तीला अत्यंत महत्त्व आहे. यशस्वी होण्यासाठी अभ्यासू वृत्ती, जिद्द आणि सातत्य हे गुण महत्त्वाचे आहेत. जगात जी माणसे मोठी झाली ती बळाच्या नव्हे तर बुद्धीच्या जोरावर मोठी झाली. त्यासाठी विनयशीलता अंगी बाळगणे गरजेचे आहे.' असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते. आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांनी कार्यशाळेचे महत्त्व विशद केले. सृष्टीची उत्पत्ती झाल्यापासून निसर्गचक्र जसे अव्याहत चालू आहे. तशी प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या दैनंदिन जीवनात एक आदर्श नियमावली तयार केली पाहिजे. नियमावली ही केवळ कागदावर असून चालणार नाही तर ती प्रत्यक्ष अंमलात आणली पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. नितीन गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. महेश कोल्हाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन अग्रणी महाविद्यालय योजनेचे समन्वयक डॉ. आर. एन. देशमुख यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. अरूण जाधव, विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)