Header Ads

Loknyay Marathi

तरुणांनी निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा : प्रमोद चौगुले

तरुणांनी निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा : प्रमोद चौगुले



सांगली : 'दिवसेंदिवस निसर्गाचा ऱ्हास होत आहे. निसर्गाचा समतोल साधला नाही तर मानवी जीवन धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वेळीच सावध होऊन तरुणांनी निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन आभाळमाया फाऊंडेशनचे संस्थापक प्रमोद चौगुले यांनी केले. येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी भारती विद्यापीठ सांगली विभागाचे संचालक डॉ. एच. एम. कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा. अरूण जाधव, स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष प्रा. भारती भावीकट्टी, प्रा. प्रदीप डिकुळे, प्रा. हंचे, डॉ. नितीन गायकवाड, प्रा. अमर तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.


विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चौगुले पुढे म्हणाले की, 'निसर्गाचे संवर्धन न करणे म्हणजे आपल्या आईला वृद्धाश्रमात ठेवण्यासारखे आहे. आई ही जगातली सर्वात मोठी त्याग मूर्ती आहे. निसर्ग आपल्याला आई समान सांभाळ करीत असतो. तो आपल्याकडून काही मागत नाही उलट आपल्याला तो भरभरून देत असतो. त्यांचे संवर्धन करणे आपली जबाबदारी आहे.'


महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, 'आपल्या देशात नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक आहे. विविधतेने नटलेला देश म्हणून जगाच्या पाठीवर भारताची ओळख आहे. त्याचबरोबर 'तरुणांचा देश' म्हणूनही आपल्या देशाला ओळखले जाते. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आपले योगदान महत्त्वाचे ठरणार आहे.


या वेळी विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना तसेच विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राध्यापकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांच्या कलागुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. अमित सुपले यांनी केले, अहवाल वाचन प्रा. भारती भावीकट्टी यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. आर. एन. देशमुख यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अनिकेत जाधव यांनी केले.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)