वैश्विक व शाश्वत विकासासाठी संशोधन आवश्यक : डॉ. राकेश मुदगल
वैश्विक व शाश्वत विकासासाठी संशोधन आवश्यक : डॉ. राकेश मुदगल
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सहावी विज्ञान राष्ट्रीय परिषद संपन्न
सांगली : 'पृथ्वीवरील नैसर्गिक स्रोत सुनियोजित पद्धतीने वापरत नसल्याने तसेच या स्रोतांचे स्वार्थापोटी अमर्याद पद्धतीने शोषण करत असल्यामुळे भविष्यातील पिढीला प्रचंड मोठा धोका निर्माण होत आहे. हे संभाव्य धोके टाळण्यासाठी व शाश्वत विकासासाठी यावर संशोधन होणे खूप गरजेचे आहे असे प्रतिपादन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर येथील कुलगुरू डॉ.राकेशकुमार मुदगल यांनी केले.
येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात 'रिसेंट ट्रेंड्स इन प्युअर अँड अप्लाईड सायन्सेस' या विषयावर आयोजित सहाव्या राष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या बीजभाषणात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारती विद्यापीठाचे सांगली विभागीय संचालक डॉ. एच. एम. कदम, प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. जी . एस. राशिनकर, एन.एम.आय.एम. एस.विद्यापीठ, मुंबई येथील जैविक विज्ञानाचे प्राध्यापक डॉ. बी. व्ही. कुंभार तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अमित सुपले, परिषदेचे समन्वयक प्रा.भारती भावीकट्टी, डॉ. बी. बी. बल्लाळ, परिषदेचे सचिव डॉ. टी. आर. लोहार, परिषदेचे खजिनदार प्रा.एच. व्ही.वांगीकर आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. मुदगल म्हणाले की, 'मातीची सृजनशीलता दिवसेंदिवस कमी होत आहे, भविष्यात धान्य पिकवण्यासाठी सकस माती उपलब्ध असणार नाही, तेव्हा काय होईल याचा विचार आताच केला पाहिजे. सौर ऊर्जा आपण वापरतो पण त्यासाठी वापरलेल्या ग्रिड्स कशा नष्ट करायच्या? नवीनवीन व प्रदूषण न करणाऱ्या ऊर्जा मिळवण्यासाठी काय केले पाहिजे यावर संशोधन व्हायला हवे. शुद्ध व स्वच्छ हवा आणि पाणी मिळणे या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्या स्वच्छ व प्रदूषण मुक्त राहतील यासाठी विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनी संशोधन करावे. हवा, पाणी, माती वाचवणे हे प्रत्येक सुशिक्षित माणसाचे काम आहे. त्यासाठी ऊर्जा, पर्यावरण व नैतिकता या गोष्टींवर भर देऊन काम करणे गरजेचे आहे.' असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, 'विज्ञान व तंत्रज्ञानाचा सद्य:स्थितीमधील विकास होणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाने झालेला विकास हा मानवजातीला जसा हितकारक आहे तसाच तो अन्य सजीवसृष्टीच्या अहिताचा होणार नाही याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे व त्या अनुषंगाने वाटचाल केली पाहिजे.'
दुसऱ्या सत्रातील प्रमुख वक्ते प्रा.डॉ.गजानन राशीनकर यांनी सपोर्टटेड आयोनिक लिक्वीड्स हे कॅन्सरसाठी कसे उपयुक्त आहेत यावर आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. बजरंग कुंभार यांनी रूबेला या विषाणूचा संसर्ग आणि त्यावरील उपचार या विषयी मार्गदर्शन केले.
तिसऱ्या सत्रात विविध महाविद्यालयातील एकूण ६५ विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक पोस्टरचे सादरीकरण केले. त्यातील चार विद्यार्थ्यांची उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल निवड करून त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित पाहुण्यांचा परिचय डॉ. अमित सुपले यांनी करून दिला. स्वागत व प्रास्ताविक प्रा.भारती भावीकट्टी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संजीवनी भेडसे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. टी. आर. लोहार यांनी केले. या प्रसंगी विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक, पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment