उद्योजक बनण्यासाठी भांडवलापेक्षा संधीचा शोध घ्या : डॉ. ए. एच. चौगुले
उद्योजक बनण्यासाठी भांडवलापेक्षा संधीचा शोध घ्या : डॉ. ए. एच. चौगुले
सांगली : 'उद्योजक बनण्यासाठी भांडवल, जागा, मनुष्यबळ आणि वेळ हे घटक महत्त्वाचे असले तरी योग्य वेळी योग्य संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वप्रथम भांडवलापेक्षा संधीचा शोध घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉ. ए. एच. चौगुले यांनी केले. येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत 'उद्योजगता विकास आणि शासकीय अर्थसहाय्य' या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय कार्यशाळेत प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. या वेळी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, अग्रणी महाविद्यालय योजनेचे समन्वयक डॉ. आर. एन. देशमुख, डॉ. अनिकेत जाधव उपस्थित होते.
पुढे बोलताना चौगुले म्हणाल्या की, उद्योजक बनायचे असेल तर लहानपणापासूनच स्वप्ने उराशी बाळगली पाहिजेत. भारताला महासत्ता बनवायचे असेल तर जास्तीत जास्त तरूणांनी उद्योजकतेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. लोकांची गरज ओळखून आणि जोखीम पत्करून जो या क्षेत्रात पदार्पण करतो तो यशस्वी उद्योजक बनतो. अलीकडे उद्योजकतेसाठी शासनस्तरावर विविध योजना व अनुदान उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी काळानुरूप बदलून या क्षेत्राकडे करिअरच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे.
या वेळी अध्यक्षीय भाषणात डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, 'आज सर्वजण शासकीय नोकरी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे पण उद्योजक होण्यासाठी अनास्था दिसून येते. नवीन शैक्षणिक धोरणात शासनाने कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रमाला महत्त्व दिले आहे. आपण दुसऱ्याकडे काम करण्यापेक्षा दुसऱ्यांनी आपल्याकडे काम करावे हा विशाल दृष्टिकोन प्रत्येकाने ठेवला पाहिजे.'
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. अनिकेत जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राहुल गोडबोले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. आर. एन. देशमुख यांनी केले. यावेळी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment