Header Ads

Loknyay Marathi

समाजात राहून समाजासाठी काम करणे हे राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट : प्राचार्य डॉ. उल्हास माळकर

समाजात राहून समाजासाठी काम करणे हे राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट : प्राचार्य डॉ. उल्हास माळकर


कसबे डिग्रज (ता.मिरज) - 'कोणतेही काम मनापासून केले तर आपल्याला यश निश्चित मिळतेच म्हणून समाजात राहून समाजाच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडवणे आणि त्यातूनच आपला व्यक्तिमत्त्व विकास व प्रगती करणे हे राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्ट आहे' असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. उल्हास माळकर यांनी केले. सांगली येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे, डॉ. सिकंदर जमादार, निखिल तेली आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना माळकर म्हणाले की, वसंत दादा पाटील, यशवंतराव चव्हाण, डॉ. पतंगराव कदम हे माझ्या आयुष्यातील आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर समाज परिवर्तन घडवून आणले. खऱ्याअर्थाने ते समाजासाठी जगले. त्यांच्या कार्याची प्रेरणा आपण घेतली पाहिजे. उद्घाटनपर भाषणात डॉ. सिकंदर जमादार यांनी शिबिराचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.

अध्यक्ष मनोगतात व्यक्त करताना प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, आयुष्यात आपल्याला मोठे व्हायचे असेल, आदर्श माणूस व्हायचे असेल तर राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्ट्ये जपली पाहिजेत. श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शरीर, मन आणि बुद्धीचा विकास होतो. आपले व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल तर अशा प्रकारची शिबिरांमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. म्हणून श्रमसंस्कार शिबिराकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.

या वेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. विकास आवळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. मंगेश गावीत यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. रूपाली कांबळे यांनी केले.  या प्रसंगी कसबे डिग्रज गावचे उपसरपंच  श्री निखिल तेली, ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रशांत भाऊ भोसले, त्यांचे सहकारी सदस्य, विविध सहकारी सोसायटीचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)