ग्रंथ हेच जीवनाचे दीपस्तंभ -डॉ. एस. व्ही. पोरे
ग्रंथ हेच जीवनाचे दीपस्तंभ -डॉ. एस. व्ही. पोरे
सांगली : भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथान यांचा जन्मदिवस दरवर्षी ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्म १८९२ साली मद्रास प्रांतातील शियाली तेथे झाला. त्यांनी ग्रंथालय शास्त्राच्या पाच सिद्धांताद्वारे ग्रंथालय व्यवस्थापन आणि वाचक केंद्रित सेवेत क्रांती घडवून आणली. त्यांनी द्विबिंदू वर्गीकरण पद्धत तयार केली. त्याचबरोबर भारतातील ग्रंथालय चळवळ निर्माण करण्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. ग्रंथालय शास्त्रातील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथान यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. पोरे यांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करूनअभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले, डॉ. एस. आर. रंगनाथान यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यायचा असेल तर वाचन संस्कृती रुजविणे ही काळाची गरज आहे. ग्रंथ हे केवळ शब्दांचे संग्रह नसून ते जीवनाचे एक प्रकारे मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत. समाजातील विचार व आपली संस्कृती ग्रंथांमुळेच कळते. जीवनाच्या प्रत्येक वळणावर ते नवे अर्थ उलगडतात, नवी दिशा दाखवितात. या ग्रंथामध्ये दडलेल्या अनमोल खजिन्याचे रक्षण व प्रसार करण्याचे कार्य आपली ग्रंथालये करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली पावले सोशलमिडिया बाजूला ठेवून ग्रंथालयाकडे वळविली पाहिजेत, असे मत डॉ. एस. व्ही. पोरे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन, प्रास्ताविक महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. जयश्री हाटकर यांनी केले, तसेच डॉ. एस. आर. रंगनाथान यांच्या कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपले, ज्युनिअर विभाग प्रमुख प्रा. ए. एल. जाधव, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. आर. डी. वाघमारे यांनी केले, तर आभार डॉ. ए. ए. जाधव यांनी मानले.
(Bharari Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment