Header Ads

Loknyay Marathi

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

डॉ.पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा


सांगली : भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व क्रीडापटू डॉ. शिल्पा दाते उपस्थित होत्या. तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे होते. या वेळी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. डॉ. रूपाली कांबळे यांनी डॉ. शिल्पा दाते यांची प्रकट मुलाखत घेतली. या प्रसंगी डॉ. शिल्पा दाते म्हणाल्या की, 'सौंदर्य, बुद्धिमत्ता, फिटनेस व आरोग्य यावर महिलांनी विशेष लक्ष दिले पाहिजे.' स्वतःच्या फिटनेस विषयी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, मी  रुग्णालयातील दैनंदिन कामाचा व्याप सांभाळून मॅरेथॉनची तयारी केली. त्यासाठी रोज पहाटे तीन वाजता उठून सराव केला म्हणून तर दक्षिण आफ्रिकेतील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत मला यश मिळाले. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व नशिबाने मिळत नसते तर प्रबळ इच्छाशक्ती व प्रयत्नाने मिळवावे लागते.  डॉ. दाते ह्या व्यवसायाने डॉक्टर असल्या तरीही प्रबोधन कार्य, शास्त्रीय नृत्यांगना, खेळाडू अशा विविध अंगाने स्वतःला घडवून जिल्ह्याच्या पहिल्या 'आयर्न लेडी'  बनण्याची किमया त्यांनी साधली आहे.
      
या वेळी अध्यक्षीय भाषणात  डॉ.पोरे म्हणाले की, मेजर ध्यानचंद यांची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी अलौकिक आहे. त्यांच्या कष्टाचा, त्यागाचा आदर्श  तरुणांनी डोळ्यासमोर ठेवून देशाचे नाव क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल केले पाहिजे.  त्यांचा जन्मदिन "राष्ट्रीय क्रीडा दिन" म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो.
      
यावेळी उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.अरुण जाधव, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. संजय  ठिगळे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अमर तुपे यांच्या सह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिणी वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. विनायक पवार यांनी केले.


(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)