Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' कार्यशाळा संपन्न

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' कार्यशाळा संपन्न




सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' कार्यशाळेचे आयोजन ग्रंथालय, भाषा व राष्ट्रीय सेवा योजना  विभागामार्फत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एस.व्ही.पोरे, उप प्राचार्य डॉ. ए. आर. सुपले कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा . कु.जे.डी.हाटकर तसेच प्रा.एस.डी.ठिगळे, डॉ.के.एम.भवारी श्री.एस.जी.कापसे इ.मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी भारती विद्यापीठाचे संस्थापक, कुलगुरू डॉ. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
      
यावेळी मराठी विश्व् कोश निर्मिती मंडळाचे माजी सदस्य व लेखक प्रा.संजय ठिगळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, वाचन आणि लेखन या माणसाच्या जीवनाच्या अविभाज्य बाजू होत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने माणसाचा सर्वांगीण विकास होत नाही. पुस्तके वाचण्याबरोबरच माणसाला माणसं वाचता आली पाहिजेत. वाचन आणि लेखनाचे बाळकडू मला कुटुंबातून मिळाले व शाळा आणि महाविद्यालयात त्याला चालना मिळाली. एवढेच नव्हे तर भागात दुष्काळ असला तरी डोक्यात दुष्काळ असता कामा नये असे सांगणारे आजोबा आणि वाचनाची व लेखणाची आवड निर्माण करणारी आई भेटल्यामुळेच मला लेखक होता आले.  
   

वक्ते व लेखक डॉ. के.एम.भवारी आपले विचार मांडताना म्हणाले की, वाचन ही एक संस्कृती आहे तिचे संवर्धन करणे गरजेचे आहे. आपण काय वाचतो, किती वाचतो यावर आपले व्यक्तिमत्त्व घडत असते. म्हणून दैनंदिन जीवनात आपल्याला अन्नाची जशी गरज असते तशी वाचनाचीही गरज आहे.
    
लेखक एस.जी कापसे बोलताना म्हणाले की, आजच्या मोबाईलच्या जमान्यात वाचन संस्कृती लोप पावत आहे. मोबाईल संस्कृती फोफावत चालली आहे. त्यासाठी वाचनाची आवड निर्माण करणे काळाची गरज बनली आहे. वाचनाने माणसाची बुद्धी प्रगल्भ होते वाचनाने आपल्या ज्ञानात भर पडते. नेट कॅफेत बसून वेळ वाया घालवण्यापेक्षा पुस्तकाचा अनुभव खजिना असणाऱ्या ग्रंथालयात बसून वाचन करा, असे मत मांडले.
    

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एस. व्ही. पोरे म्हणाले की, वाचन केल्याने व्यक्ती जीवनामध्ये आपली प्रगती करू शकते तसेच वाचनाने माणूस वैचारिकदृष्ट्या परिपक्व होतो, प्रतिभा संपन्न यशस्वी नागरिक बनण्यासाठी वाचन आणि लेखन करणे ही ईश्वराने माणसाला दिलेले वरदान आहे. आणि ईश्वरीय वरदानाचे सोनं करणं आपल्याच हातात आहे, असे प्रतिपादन केले.
 
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. कु. जे. डी. हाटकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रुपाली कांबळे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा.रोहिणी वाघमारे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विभाग प्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)