Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने सापांच्या प्रजातींची ओळख व जनजागृती कार्यक्रम

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने सापांच्या प्रजातींची ओळख व जनजागृती कार्यक्रम 



सांगली: येथील भारती विद्यापीठाचे  डॉ. पतंगराव कदम  महाविद्यालयातील  भारती विद्यापीठाचे संस्थापक- कुलगुरू डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त व मा. आम.डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त  'समाज प्रबोधन सप्ताह 'साजरा करण्यात आला. प्राणीशास्त्र  विभागाच्या वतीने आयोजित विषारी व बिनविषारी सापांच्या प्रजातींची ओळख व जनजागृती कार्यक्रम सांगली जिल्ह्यातील मु .पो. खटाव ता. पलूस‌ या ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस.व्ही.पोरे, खटाव गावचे सरपंच मा. ओंकार पाटील, माजी उपसरपंच मा.शिवाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य महालिंग‌ मंडले, केशव पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासो चव्हाण (तात्या), प्रगतशील शेतकरी टी. बी. पाटील, प्रा. रामचंद्र पवार, पशुसंवर्धन अधिकारी संदीप भिंगारदिवे व कार्यक्रम समन्वयक प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. वर्षा कुंभार, प्रा.नलेश बहिरम, प्रा. प्रियांका जाधव इ. मान्यवर उपस्थित होते.
     
या कार्यक्रमाप्रसंगी गावचे सरपंच श्री.ओंकार पाटील म्हणाले की, घोणस साप हा भारतातील विषारी सापांपैकी एक असून, तो मुख्यतः शेतातील उंच गवत, कचरा आणि रानवेलीमध्ये आढळतो. शेतातील काम करणाऱ्यांना घोणस सापांपासून जपणे महत्त्वाचे आहे. योग्य सावधगिरी बाळगून शेतातील कामे करताना सापांच्या वावराचा अभ्यास करणे आवश्यक आहे. घोणस सापाला मारण्याऐवजी त्याला शांतपणे आपल्या मार्गावर जाऊ देणे पर्यावरणाच्या संतुलनासाठी आवश्यक आहे.
   
वरील विषयावर माहिती देताना उपस्थित असलेले विद्यार्थी म्हणाले की, सापांच्या विविध प्रजाती विषारी आणि बिनविषारी या दोन मुख्य गटांत विभागल्या जातात. भारतातील काही सामान्य विषारी सापांमध्ये नाग, मण्यार, फुरसे, आणि घोणस यांचा समावेश होतो. हे साप त्यांच्या विषामुळे जीवघेणे ठरू शकतात. विषारी साप शिकार करण्यासाठी‌ विषाचा उपयोग करतात. मात्र, ते फक्त स्वतःला धोका वाटल्यासच मानवांवर हल्ला करतात. विषारी सापांच्या दंशाने मानवाला गंभीर परिणाम होऊ शकतात, म्हणून वेळीच वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे असते. या सापांच्या ओळखीबाबत जनजागृती व त्यांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे, कारण ते पर्यावरणीय संतुलन राखण्यात मोठी भूमिका बजावतात. दुसरीकडे, बिनविषारी साप शिकार पकडण्यासाठी विषाचा वापर करत नाहीत. त्याऐवजी, ते आपली शिकार गिळून किंवा विळख्यात पकडून करतात. यामध्ये धामण, पाणसाप, वेलसाप आणि अजगर यांचा समावेश होतो. बिनविषारी साप माणसासाठी साधारणतः हानीकारक नसतात. पर्यावरणाच्या संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे साप उंदीर, कीटक, सरडे यांसारख्या प्राण्यांना भक्ष्य करून पिकांचे संरक्षण करतात आणि अन्नसाखळी टिकवून ठेवतात. त्यांच्याविषयी असलेले अज्ञान व गैरसमजांमुळे अनेकदा त्यांना नाहक मारले जाते. त्यांच्या ओळखीबाबत जनजागृती केल्यास सापांविषयीची भीती दूर होऊ शकते आणि पर्यावरणाचे रक्षण शक्य‌ होते. 
     
यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. पोरे म्हणाले की, साप हे पर्यावरणाच्या संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांच्याविषयी अज्ञानामुळे अनेकदा भीती व गैरसमज निर्माण होतात. सापांविषयी जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण अज्ञानामुळे त्यांना मारले जाते, ज्यामुळे पर्यावरणीय संतुलन बिघडते. सापांना सुरक्षित अंतर ठेवून व त्यांची ओळख करून घेऊन त्यांचे महत्त्व समजावून घेणे गरजेचे आहे. शाळा, महाविद्यालये, व सार्वजनिक ठिकाणी सापांविषयी शास्त्रीय माहिती पसरविणे आणि त्यांच्यावरील भीती दूर करणे ही आपली जबाबदारी आहे असे प्रतिपादन केले.
       
महाविद्यालयातील बी. एस्सी भाग १,२ व ३ चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये महंमदफैज पेंढारी, साधना केंदळे, प्रथमेश माने, रोहित पांढरे, श्रुतिका माळी, रोहित म्हारुगडे, तन्वी माळी, यम अली, सिद्धार्थ घोडके, सानिया सय्यद, निकिता सूर्यवंशी, महेक लगीवाले, प्रतीक्षा राजपूत, मधुरा चोपडे, अनुराधा केंगार आदी विद्यार्थी सहभागी होते.
     
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. वर्षा कुंभार यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. प्रियांका जाधव यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.नलेश बहिरम यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, खटाव गावचे सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya Sangli)