Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील श्रमसंस्कार शिबिराचा समारोप संपन्न

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील श्रमसंस्कार शिबिराचा समारोप संपन्न


सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली यांच्या वतीने मु.पो. सुखवाडी ता.पलूस या गावांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे वतीने 'श्रमसंस्कार शिबिराचा' समारोप संपन्न झाला. या श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन दि. ३० जानेवारी २०२५ ते ०५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे, उपप्राचार्य डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा.ए. एल.जाधव, सरपंच श्री. बाळासाहेब यादव, उपसरपंच सौ. अपर्णा मोहिते, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री. भगवान जगताप, स्वच्छतादूत श्री. संभाजी जगताप व बजरंग कोकाटे, मोहन जगताप, अनिल यादव, पोपट जगताप तसेच पुढारी वार्ताहर प्रदीप माने, शेती उद्योजक श्री. महेश जगताप, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास आवळे, डॉ. रूपाली कांबळे, प्रा.शंकरराव पाकले तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते.
          
या शिबिराच्या समारोपप्रसंगी अध्यक्षीय भाषणात डॉ. पोरे म्हणाले की, महाविद्यालयातील तरुणांना स्वयंशिस्त लागण्यासाठी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले. तसेच ग्राम स्वच्छतेचे एकत्र येऊन केलेले काम कसे सहकार्यात्मक होत असते याचे उत्तम उदाहरण म्हणजेच श्रमसंस्कार शिबिर. राष्ट्रीय सेवा योजनेचा विचार हा लोकांमध्ये सर्वांनी पोहचवावा त्याचबरोबर माझे विद्यार्थी, प्राध्यापक ज्या- ज्या वेळी या गावामध्ये काम असेल त्या-त्या वेळी होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये तसेच त्यांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होतील अशी मी ग्वाही देतो, आमच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व गावातील लोकांचा उत्साह पाहून आमचे श्रमसंस्कार शिबिर १०० टक्के यशस्वी झाले, हीच या गावाची पावती आहे. त्यामूळे विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यातील संवाद जास्तीत जास्त वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
     
श्री.बाळासाहेब यादव (सरपंच, ग्रामपंचायत सुखवाडी) मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, स्वावलंबी जीवन कसे जगावे, वेळेचे महत्त्व, सामाजिक न्याय, मूल्ये, वैचारिक दृष्टिकोन यांसारख्या अनेक मूल्यांची शिकवण या ठिकाणी होत असते. म्हणून ही शिबिरे खूप उपयुक्त असतात, त्यामुळे अशा प्रकारच्या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.
     
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री.भगवान जगताप (तंटामुक्ती अध्यक्ष सुखवाडी)आपल्या भाषणात म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये तत्पर असणे अत्यंत आवश्यक आहे. तप:स्विता, तेजस्विता, तत्परता या तीन गुणांची विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे. नुसते ध्येय असून चालणार नाही तर ध्येयाची प्राप्तीसाठी खडतर परिश्रम घेतले पाहिजे. तेव्हाच विद्यार्थी जीवनात यशस्वी होईल असे मत व्यक्त केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केले. यावेळी उत्कृष्ट स्वयंसेवक व स्वयंसेविका तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
      
सदर या सात दिवस झालेल्या श्रमसंस्कार शिबिरामध्ये शुक्रवार, दि. ३१/०१/२०२५ रोजी प्रा. मंगेश गावित यांनी 'औषधी वनस्पतींची ओळख व संवर्धन' या विषयावर प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष श्री.भगवान जगताप हे अध्यक्षस्थानी होते. तर विशेष उपस्थिती ग्रामपंचायत सदस्य निलेश पाटील होते. त्यानंतर शनिवार दि.०१/०२/२०२५ रोजी डॉ. अनिकेत जाधव यांनी 'आर्थिक साक्षरता' या विषयावर विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य निलेश पाटील अध्यक्ष म्हणून होते. तर विशेष उपस्थिती श्री. भगवान जगताप यांची होती.

तसेच दि.२/०२/२०२५ रविवार या दिवशी डॉ. महेश कोल्हाळ यांनी 'माती परीक्षण व आधुनिक शेती' या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी श्री. भगवान जगताप अध्यक्षस्थानी होते तर सरपंच श्री. बाळासाहेब यादव उपस्थित होते.
       
त्यानंतर डॉ कृष्णा भवारी यांनी दि.०३/०२/२०२५ रोजी 'व्यक्तिमत्व विकास आणि मानवी जीवन' या विषयावर उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्या सौ. पूजा भारती होत्या. तर विशेष उपस्थिती उपसरपंच सौ.अपर्णा मोहिते, ग्रामपंचायत सदस्या सौ. दक्षिणा जगताप, पोलिस पाटील सौ.अमृता जगताप यांची होती. तसेच मंगळवार दि.०४/०२/२०२५ रोजी विविध स्पर्धा, हळदी कुंकू समारंभ, महिला मेळावा घेण्यात आला, यावेळी १०० हून अधिक महिलांनी यात सहभाग घेतला. त्यानंतर 'आनंदी स्त्री जीवन' या विषयातून प्रबोधनात्मक व्याख्यान प्रा.सौ.भारती भाविकट्टी यांनी दिले.
           
या श्रमसंस्कार शिबिरामध्ये ग्रामस्वच्छता अभियान, व्यक्तिमत्व विकास, व्यसनमुक्ती अभियान, राष्ट्रीय एकात्मता, आरोग्य व स्वच्छता जनजागृती, वृक्षारोपण, मतदान जनजागृती प्रबोधन रॅली, सर्वेक्षण उपक्रम असे विविध उपक्रम राबविण्यात आले. या सर्व उपक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदर शिबिरामध्ये सुरुवातीच्या दिवसापासून ते शेवट दिवसापर्यंत गोड स्नेहभोजन श्री. बाळासाहेब यादव, श्री. सनी यादव, श्री.भगवान जगताप, श्री. निलेश पाटील, सौ पूजा भारती, सौ.अपर्णा मोहिते, श्री.पांडुरंग मोहिते, श्री. सतीश जमदाडे, श्री. विष्णू पाटील, श्री. हिम्मत कदम यांच्याकडून देण्यात आले. तसेच चहा व नाश्ता श्री. मोहन जगताप, श्री .बजरंग कोकाटे, श्री.संजय पाटील, श्री. संभाजी जगताप यांच्याकडून देण्यात आला. त्यामुळे स्वयंसेवक विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.
      
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. विकास आवळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. रूपाली कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.रोहिणी वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, शिबिरार्थी स्वयंसेवक, स्वयंसेविकी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)