डॉ .पतंगराव कदम महाविद्यालय पुरस्कृत खंडोबाचीवाडी येथे जनजागृती कार्यक्रम साजरा
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय पुरस्कृत खंडोबाचीवाडी येथे जनजागृती कार्यक्रम साजरा
सांगली: येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयामधील भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने भारती विद्यापीठाचे संस्थापक - कुलगुरू डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त व भारती विद्यापीठाचे कार्यवाह मा. आ. डॉ. विश्वजीत कदम साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'समाजप्रबोधन सप्ताह' अंतर्गत डॉल्बी आणि लेसरचे दुष्परिणाम या विषयावर जनजागृती कार्यक्रम सांगली जिल्ह्यातील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील विद्यालय, खंडोबाचीवाडी ता. पलूस येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बाबासाहेब महिंद, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ.दादा नाडे, प्रा. हर्षल वांगीकर व विद्यालयाचे शिक्षक आदि उपस्थित होते. यावेळी प्र. प्राचार्यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पोरे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच डॉल्बी आणि लेसरपासून होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती करून घेतली पाहिजे.तसेच आधुनिक युगात याची जनजागृती करणे ही काळाची गरज आहे, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. नाडे प्रबोधनात्मक व्याख्यान देताना म्हणाले की, सर्वसाधारण डॉल्बीचा आवाज व त्याची मर्यादा याबद्दल सखोल माहिती सर्वांना असायला पाहिजे. तसेच डॉल्बीच्या आवाजाने हृदय विकाराचे आजार बळावतो, त्यामुळे डॉल्बीच्या जवळ जाऊन उभे राहणे टाळावे आणि शक्य असल्यास डॉल्बीचा वापरही टाळावा. याशिवाय डॉल्बी सोबत लावलेले लेसर किरणांपासून होणारे दुष्परिणाम कसे घडतात याबद्दल त्यांनी प्रत्यक्षात घडलेल्या घटनांचे पुरावे दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. वांगीकर यांनी केले.तसेच या कार्यक्रमास खंडोबाचीवाडीचे ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment