विद्यार्थ्यांमध्ये सॉफ्ट स्किल्स गरजेचे - डॉ. जी. व्ही. माळी
विद्यार्थ्यांमध्ये सॉफ्ट स्किल्स गरजेचे - डॉ. जी. व्ही. माळी
सध्याचे युग हे आधुनिक युग आहे. या युगात विद्यार्थ्यांनी आधुनिकतेबरोबरच स्वत:च्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन डॉ. जी. व्ही. माळी यांनी केले. येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात सुक्ष्मजीवशास्त्र विभागाअंतर्गत आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. डॉ. जी. व्ही. माळी हे सध्या यशवंतराव मोहिते महाविद्यालय, पुणे येथे उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. सांगलीतील भारती विद्यापीठाचे ते माजी विद्यार्थी असलेपासून ते आतापर्यंतचा त्यांचा प्रवास, महाविद्यालयाची जडण-घडण व प्रगती याचा आलेख त्यांनी सदर मार्गदर्शनात सादर केला. तसेच सध्याचे व पुर्वीचे शिक्षण, शिक्षक यातील बदल त्यांनी सांगितला. विद्यार्थ्यांनी आपल्यातील न्यूनगंड बाजूला ठेवला पाहिजे, तसेच स्वत:च्या क्षमता त्यांनी वाढवल्या पाहिजेत व करिअरसाठी योग्य दिशा निवड हे खुप महत्वाचे आहे. विकसित भारत घडविण्यामध्ये युवकांची भूमिका फार महत्वाची आहे असे त्यांनी सांगितले. याचबरोबर सुक्ष्मजीवशास्त्रातील नोकरीच्या विविध संधी बाबत मार्गदर्शन केले. यासोबतच नवीन राष्ट्रीय धोरण व त्यातील विविध बाबी त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात मांडल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस्. व्ही. पोरे होते. अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, भविष्यातील विकसित भारत साकारण्यामध्ये युवक हा केंद्रबिंदू आहे. युवकांनी विविध कौशल्ये अंगीकृत केली पाहिजेत. याकरिता डॅा. माळी यांची व्याख्यान मालिका आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.
तसेच ते पुढे म्हणाले की, आपल्या महाविद्यालयालयातील सुक्ष्मजीवशास्त्र हा एक आदर्शवत विभाग आहे. याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी स्वत:चे चॅनेल युट्युबवर बनवावे व तेथे सुक्ष्मजीवशास्त्र संबंधीत व्हीडीओ सामान्य जनमाणसांना समजतील अशा प्रकारे बनवून ते अपलोड करावे, प्रसंगी महाविद्यालयाकडून व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख कु. भारती भावीकट्टी यांनी केले. तसेच प्रमुख पाहुण्यांचा सत्कार गुलाब पुष्प व पुस्तक देऊन डॉ. एस्. व्ही. पोरे यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. एम्. जे. धनवडे यांनी आभार मानले. श्री. ए. ए. मुलाणी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. या कार्यक्रमाकरिता सुक्ष्मजीवशास्त्रातील प्राध्यापक श्री. एम्. एस्. पटेल, कु. एस्. एस्. पाटील, कु. व्ही. एस्. पाटील व बी. एस्. सी. भाग ३, एम्. एस्सी. भाग १ व २ मधील विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment