Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महिला आणि उद्योजकता या विषयावर व्याख्यान संपन्न

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात महिला आणि उद्योजकता या विषयावर व्याख्यान संपन्न


सांगली, दि.8/3/25
येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त उद्योजिका सौ.नाझिया शेख यांचे महिला आणि उद्योजकता या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.


व्याख्यानात बोलताना त्यांनी आपल्या शून्यातून ब्लॉसम लेमिकोट हा उद्योग स्थापन करण्यापर्यंतचा अथक अवघड प्रवास आणि संघर्ष सांगितला. त्याबरोबरच सर्व महिलांमध्ये क्षमता असतेच, पण स्वतःची क्षमता ओळखून, आलेल्या अडचणींना तोंड देत, न घाबरता महिलांनी धाडसाने स्वयंपूर्ण होण्याकडे प्रवास केला पाहिजे असे आवाहन केले. पुढे बोलत असताना त्या म्हणाल्या महिला घर संसाराची जबाबदारी सांभाळत असताना एकाच वेळी अनेक कामे करण्याचे कसब शिकलेल्या असतात, त्याचा उद्योगधंद्यामध्ये खूप चांगला वापर होतो. माणसे जोडली आणि कामाचा आणि उत्पादनाचा दर्जा टिकवून ठेवला तर धंद्यात पाय रोवता येतो. येणाऱ्या अडचणीला संधी समजून त्यातून मार्ग काढून महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. 
 
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ.पोरे होते. अध्यक्षीय मार्गदर्शनात बोलत असताना ते म्हणाले आपण अडचणींना कंटाळून महिलांनी आत्महत्या केल्याचे ऐकत नाही कारण महिला जास्त सक्षम,कणखर आणि कष्टाळू असतात. महिलांचा कोमल स्वभाव, त्याग हा कुटुंब टिकवून ठेवण्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत असतो. महिला सक्षम आहेतच फक्त समाजातील इतर वर्गाला याची जाणीव करून देणे आणि त्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आपले म्हणणे प्राचार्यांनी उदाहरणे देऊन स्पष्ट केले.

उपप्राचार्य डॉ. अमित सुपले यांनी आपल्या मनोगतात महिला मुक्तीसाठी, महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी काम केलेल्या समाजसुधारकांचे योगदान आज आठवणीत ठेवले पाहिजे असे सांगितले तसेच शेतीचा शोध लावून महिलांनीच माणसाला एका ठिकाणी राहण्याचे शिकवले आणि कुटुंबसंस्था उदयास आली असे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत महिला विकास समितीच्या समन्वयक कु. भारती भावीकट्टी यांनी केले. त्यांनी महिला दिन का साजरा करायचा, महिलांसमोर काय उद्दिष्ट असले पाहिजे याविषयी उद्बोधन केले.

कु. रोहिणी वाघमारे यांनी सुरमई ही कविता सादर केली.सौ. पुनम रासनकर यांनी त्यांच्या आईने लिहिलेली महिला दिन विषयक कविता सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वंदना सातपुते यांनी केले तर आभार प्रा. कु. जयश्री हाटकर यांंनी मानले.

कार्यक्रमासाठी सौ. वासंती गावडे, डॉ. रूपाली कांबळे, डॉ. वर्षा कुंभार, सौ. अरुणा सूर्यवंशी, सर्व महिला प्राध्यापक तसेच बहुसंख्य विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)