डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालयांतर्गत कार्यशाळा संपन्न
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालयांतर्गत कार्यशाळा संपन्न
सांगली: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व भारती विद्यापीठाचे डॉ.पतंगराव कदम महाविद्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रणी महाविद्यालयांतर्गत ग्रंथालय व अंतर्गत गुणवत्ता कमी विभागामार्फत 'आभासी युगातील वाचन संस्कृती' या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज सांगलीचे प्राचार्य प्रा. (डॉ.) बी. पी. लाडगांवकर, विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) साताप्पा सावंत, मिरज महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) उल्हास माळकर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यशाळेस विषय तज्ज्ञ म्हणून श्रीमती पुतळाबेन शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली च्या ग्रंथपाल प्रा.डॉ. सौ. संध्या यादव व नारायणदास सर्वोत्तमदास सोटी लॉ कॉलेज सांगलीचे ग्रंथपाल प्रा. ए. बी. साळुंखे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही.पोरे होते.
उद्घाटन प्रसंगी प्रा. (डॉ.) बी.पी. लांडगांवकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी, त्यांना नवनवीन विषयावरील ज्ञान मिळवण्यासाठी व हे ज्ञान आपल्या महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत अशा विविध कार्यशाळा आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन दिलेले आहे. याचा सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन मिळालेले ज्ञान वृध्दिंगत करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले.
प्रा.( डॉ.)साताप्पा सावंत म्हणाले की, पूर्वीच्या काळात मर्यादित प्रिंटेड वाचन साहित्य उपलब्ध होते. त्यामुळे ग्रंथालयातून पुस्तकं मिळवण्यासाठी वेटिंग करून वाचन केले जात होते. आता टेक्नॉलॉजी बदलल्यामुळे मोबाईलवर, गुगलवर अफाट वाचन साहित्य उपलब्ध आहे, ई-बुकच्या स्वरूपात पुस्तक उपलब्ध आहेत. प्रत्येकाने काही ना काही वाचलेच पाहिजे.
प्रा. ( डॉ.) उल्हास माळकर यांनी ग्रंथालयांचा पारंपरिक ते आधुनिक प्रवास कसा बदलत गेला हे विषद करीत, प्रत्येकाने रोज काही ना काही तरी वाचन साहित्य वाचले पाहिजे, तरच वाचन संस्कृती वाढेल असे मत मांडले. पुढे बोलताना ते म्हणाले, आजच्या आभासी युगात डिजिटल व आभासी वाचन साहित्यामध्ये वाढ होत आहे, काळाप्रमाणे वाचन साहित्य बदलत आहे, आपण आभासी वाचन संस्कृतीकडे गेले पाहिजे व वाचन केले पाहिजे, असे मत मांडले.
अध्यक्षीय भाषणात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) एस. व्ही. पोरे म्हणाले, समाजातील एक सुजाण नागरिक म्हणून वावरत असताना आपल्याबरोबरच समाजातील अन्य घटकांनाही वाचन संस्कृतीचे महत्त्व पटवून त्यांना वाचनासाठी प्रेरित करणे हे प्रत्येकाने आपले कर्तव्य समजले पाहिजे. प्रत्येकाने समाजातील अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्व समोर ठेवून त्यांनी आपल्या जीवनात वाचनासाठी किती महत्त्व दिले होते, हे पाहिले पाहिजे. वाचनामुळे आज या व्यक्ती समाजासाठी महान कार्य करू शकल्या होत्या. त्यामुळे प्रत्येकाने वाचनाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. वाचाल तरच वाचाल ! असा कानमंत्रही त्यांनी दिला.तसेच कार्यशाळेस उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात प्रा.डॉ. सौ. संध्या यांनी 'वाचन संस्कृती: ज्ञान आणि विकासाची गुरुकिल्ली' या विषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी वाचन संस्कृती म्हणजे काय, वाचन संस्कृतीचे महत्त्व तसेच वाचन संस्कृती वाढविण्याचे विविध उपाय सांगितले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रा. ए. बी. साळुंखे यांनी ' ई- रिसोर्सेस' या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी ई- रिसोर्सेस म्हणजे काय, ई- रिसोर्सेस चे प्रकार, ई - रिसोर्सेस चे फायदे, विद्यार्थ्यांसाठी पॉप्युलर असलेले ई -रिसोर्सेस, फॅकल्टीसाठी उपयुक्त असलेले ई- रिसोर्सेस कोणकोणते आहेत हे सांगत ई- रिसोर्सेसचा ॲक्सेस कसा मिळवायचा, ते वापरताना कोणकोणत्या अडचणी येतात त्याचबरोबर भविष्यातील ई- रिसोर्सेसचा ट्रेंड काय असेल याचे सविस्तर विवेचन केले. त्यामुळे काळाबरोबर आपण बदलत आता ई- रिसोर्सेसचा वापर केला पाहिजे असे त्यांनी सांगितले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.अमित सुपले, प्रमुख अग्रणी महाविद्यालय समन्वयक डॉ.आर.एन. देशमुख, अग्रणी महाविद्यालय समितीचे समन्वयक प्रा. सतीश कांबळे, कार्यशाळा समन्वयक ग्रंथपाल प्रा. जयश्री हाटकर आदि उपस्थित होते.
या कार्यशाळेचे स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. ए. आर. सुपते यांनी केले, तर प्रा. जयश्री हाटकर यांनी पाहुण्याचा परिचय करून दिला. आभार प्रदर्शन डॉ. आर. एन. देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. वंदना सातपुते यांनी केले. या कार्यशाळेस अग्रणी महाविद्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment