जागतिक ग्रंथदिन
जागतिक ग्रंथदिन
अर्थेन भेषजं लभ्यमारोग्यं न कदाचन।
अर्थेन ग्रन्थसंभारः ज्ञानं लभ्यं प्रयत्नतः।।
पैसे देऊन औषध मिळते, पण आरोग्य कधीही पैसे देऊन मिळत नाही. पैशांनी पुस्तकांची चळत विकत मिळते, पण त्यामुळे ज्ञान मिळत नाही ते कष्टाने मिळवावे लागते.
२३ एप्रिल जगप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार विल्यम शेक्सपियरचा जन्मदिन आणि तसेच मृत्युदिनही! हा जगातील विलक्षण अत्यंत दुर्मिळ योग म्हणावा लागेल. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जगभर हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी या दिवशी ग्रंथविषयक कार्यक्रम आयोजिण्याची प्रथा रूढ झाली. २३ एप्रिल या तारखेचे महत्त्व ग्रंथजगताला अजून एका दृष्टीने आहे. १७ व्या शतकातील प्रख्यात स्पॅनिश नाटककार, कवी व कादंबरीकार मिग्युल दे सेर्व्हांटेस सावेड्रा यांचा २२ एप्रिल १६१६ रोजी मृत्यू झाला व त्याचे दफन २३ एप्रिल रोजी करण्यात आले. या घटनेचे स्मरण ठेवून स्पेनमधील ग्रंथविक्रेत्यांनी मिग्युलच्या स्मरणार्थ २३ एप्रिल १९२३ रोजी ग्रंथदिन पाळला.
ग्रंथदिनाला जागतिक स्वरूप आले ते युनेस्को या संस्थेच्या एका निर्णयामुळे. ग्रंथांचे वाचन, प्रकाशन व त्यांच्या स्वामित्वहक्काविषयी (कॉपीराइट) मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण व्हावी याकरिता प्रोत्साहन देण्याकरिता २३ एप्रिल १९९५ पासून दरवर्षी जागतिक ग्रंथ तसेच स्वामित्वहक्क दिन पाळण्याचा निर्णय युनेस्कोने घेतला. जागतिक ग्रंथदिन हा २३ एप्रिलला साजरा करण्यात येतो.
जागतिक स्तरावर सर्वाधिक पुस्तके प्रकाशित करणा-या पहिल्या दहा देशांमध्ये भारताचा सहावा क्रमांक तर अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. तेथे २०१० मध्ये नवी पुस्तके व जुन्या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या असे मिळून सुमारे ३,२८,२५९ पुस्तके प्रकाशित झाली. याच प्रकारातील दरवर्षीची आकडेवारी लक्षात घेतली तर इंग्लंड (२०,६००० पुस्तके), चीन (१,८९,२९५), रशिया (१,२३,३३६), जर्मनी (९३,१२४), स्पेन (८६,३००), भारत (८२,५३७), जपान (७८,५५५), इराण (६५,०००), फ्रान्स (६३,६९०) अशा क्रमाने ही यादी आहे.
ज्याचं वाचन चांगलं त्याचं लिखाणही उत्तम असतं. चला तर मग आजच्या दिनी रोज पुस्तकाचे किमान एक तरी पान नियमितपणे वाचन करण्याचा संकल्प करु या.
सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
"वाचाल तर वाचाल"!
Post a Comment