डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वाचन दिन साजरा
डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वाचन दिन साजरा
भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथे दि. १९ जून २०२१ रोजी ‘वाचन दिना’ निमित्त ‘वाचनाची गरज’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदरचा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून आयोजित करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध नेत्र रोग तज्ज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे होते. याप्रसंगी सांगली-मिरज-कुपवाड महानगर पालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती मा. हरिदास पाटील उपस्थित होते. प्रारंभी ग्रंथपाल प्रा. जे. डी. हाटकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविककेले. वाचन दिनाचा उद्देश विषद करत ग्रंथालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. सदरच्या कार्यक्रमात मा. हरिदास पाटील यांनी आपले अनुभव कथन केले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. दिलीप पटवर्धन म्हणाले की, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर माशासारखे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाल तरच तुम्ही यशस्वी व्हाल. माणसाने कायम नाविन्याचा शोध घेतला पाहिजे. आपली वृती संशोधक असली पाहिजे. वेगवेगळ्या माहितीचा शोध घेतला पाहिजे. ही सर्व गरज पुस्तकांमधूनच भागते. सध्या सर्वजण गुगलवर माहितीचा शोध घेतात पण ती माहिती किती खात्रीशीर आहे हे पाहत नाहीत. इंटरनेटवर किंडल एडिशन वाचण्यापेक्षा प्रिंटेड पुस्तके वाचा. ते चांगले स्मरणात राहते. नवीन पुस्तकांचा वास वेगळाच असतो तो वाचनास एक प्रकारे प्रेरित करतो. हस्तलिखिते वाचा कारण हस्ताक्षरात भावना भरलेल्या असतात, हे पोस्टाच्या पत्राचे उदाहरण देवूनही सांगितले. पुस्तकांना आपण देव मानतो. त्याला पाय लागला की आपण नमस्कार करतो, तसे किंडल एडिशनला होत नाही. अनेक दिग्गज लेखकांची उदाहरणे त्यांनी दिली. लेखकांचा व त्यांच्या लेखनावर इतका प्रभाव असतो, की लेखकाचे नाव ऐकले की त्यांनी लिहिलेले पुस्तक डोळ्यासमोर उभे राहते. शिवाजी सावंत म्हटले की मृत्युंजय, रणजित देसाई म्हटले की स्वामी, गुलामगिरी म्हटले की जोतिबा फुले, श्यामची आई म्हटले की साने गुरुजी, गीतरामायण म्हटले की ग.दि. माडगुळकर. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी वेगवेगळे उपाय डॉ. पटवर्धनांनी सांगितले. यामध्ये प्रत्येकाने याची सुरवात स्वत:पासून केली पाहिजे. आपल्या घरात पुस्तके आणली पाहिजेत. पालकांना पुस्तकं वाचताना पहिले की त्यांची मुलंही पुस्तके वाचतात. लेखक भेटीस आणणे, पुस्तकं प्रदर्शन भरवणे, वर्गात पुस्तकांचे एक कपाट ठेवणे व वर्गात रोज एक तास वाचनाचा ठेवणे, विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करणे, त्यासाठी बक्षीस वितरण करणे, प्रेरणादायी व्यक्तींचे मार्गदर्शन आयोजित करणे इ. उपाय सांगितले. वाचानानेच माणूस समृद्ध होतो व त्याची विचार करण्याची क्षमता बदलते. सुरवातीला रोपी भाषा आलेली तुमच्या आवडीची पुस्तके वाचा व नंतर तत्वज्ञान, प्रभावी विचारांची पुस्तके वाचा. प्रत्येकाच्या जीवनाला कलाटणी देण्याचे काम पुस्तकेच करतात व समाजासमोर एक आदर्श व्यक्ती म्हणून उभे करतात.
अध्यक्ष म्हणून बोलताना प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. ज्ञानवृद्धी करण्याचे काम खऱ्या अर्थाने ग्रंथालये करीत असतात. समृद्ध ग्रंथालये हीच खरी मोठी संपत्ती आहे व ती जतन करण्याची जबाबदारी तरुणाईने केली पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपाली कांबळे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. ए.एम. सरगर यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)
Post a Comment