Header Ads

Loknyay Marathi

द लास्ट गर्ल


द लास्ट गर्ल

I want to be the last girl in the world with a story like mine- .अशी कहाणी असलेली मी जगातील शेवटचीच मुलगी असावी.2018 च्या शांतता नोबेल ची मानकरी नादिया मुराद च्या आत्मकथेतील हे शेवटचं वाक्य आहे. नादिया मुराद इराकमधील कोचो खेड्यातील सर्वसामान्य यजीदी संयुक्त कुटुंबातील 21 वर्षाची तरुणी. कुटुंबाचे उत्पन्न अत्यंत तुटपुंजे तरीही आनंदी आणि समाधानी असणारे हे कुटुंब. कोचो हे यजीदीच गाव, इराकच्या सिंजर प्रदेशातील दक्षिणी टोकाचं, भटके शेतकरी व मेंढपाळांनी बसवलेले. शेजारच्या इराकी सुन्नी, अरब लोकांशी सलोख्याचे संबंध ठेवून अत्यंत सामान्य जीवन जगणारे. इराक मध्ये युद्ध सुरू झाले आणि शेजारी असणाऱ्या खेड्यामध्ये सलोख्याच्या संबंधांचे रूपांतर तिरस्कारत होऊन हिंसाचार परस्परांमध्ये सुरू झाला. लेखिका म्हणते इथूनच दहशतवादाला सुरुवात झाली..!!! कोचो मधील खेड्यातून सुरुवातीला कधी कोंबड्या तर कधी मेंढ्या पळवून नेल्या जाऊ लागल्या. काही दिवसांनी माणसांना पळवून त्यांच्या घरातील इतर सदस्यांना धमकी दिली जाऊ लागली. धर्म बदलायला तयार रहा नाहीतर पळवून नेलेल्या व्यक्तींना मारून टाकू. असं करत करत एक दिवस संपूर्ण कोचोला आयसिसने वेढा दिला. गावातील लोक बाहेरच्या शहरातील आपल्या नातेवाईकांना फोन करून मदतीची याचना करत होते. पण सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. गावातील सर्व रहिवाशांना एका शाळेत नेऊन त्यांची पुरुष, लहान मुले, विवाहित अविवाहित तरुण वयस्क स्त्रिया अशी विभागणी केली. पुरुषांना एकाच वेळी गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. वयस्क महिलांना देखील याच पद्धतीने मारून सामूहिक कबरीत दफन करण्यात आले. लहान मुलांना ब्रेनवॉश करून आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण संस्थेत पाठविले. विवाहित अविवाहित अशा सर्व तरुणींना सबाया / सेक्स गुलाम ( सेक्स स्लेव्ह ) म्हणून विकायला आणि वापरायला सुरुवात केली. कोचो मधील झालेल्या हत्याकांड यामध्ये नादिया मुराद च्या सहा भावांना व आईलाही मारले, तिच्यासह सर्व बहिणींना, भाच्यांना व गावातील सर्व तरुणींना सबाया बनविले. अशा रीतीने धर्मांधतेचा कट्टरतेने सुखी-समाधानी कुटुंबाची व संपूर्ण कोचो गावची वाताहात झाली. सुरुवातीला नादीयाला हाजी सलमान की जो पेशाने न्यायाधीश होता आणि त्याचा दरारा होता. त्याने नादियाला विकत घेतले. तिला तो प्रचंड मारहाण करत असे व तिच्या धर्माबद्दल सतत वाईट बोलत असे. नादीयाने त्याच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण ती दुर्दैवाने सापडली तेव्हा हाजीने तिला चाबकाने फोडून काढले आणि आपल्या सहा सुरक्षारक्षकांना तिच्यावर बलात्कार करण्यास सांगितले अगदी ती बेशुद्ध पडेपर्यंत. या घटनेनंतर तिला विकण्यात आले. जाणे तिला विकत घेतले त्याने व त्याच्या ड्रायव्हरने मिळून तिच्यावर बलात्कार केला आणि तिला चेकपोस्टवर सोडलं की जिथे येणाऱ्या-जाणाऱ्या कुणा ही दहशतवाद्यांसाठी!!!!!. तिच्यावर हा अत्याचार सतत तीन महिने सुरू होता. एके दिवशी चेक पोस्टवरून एक दहशतवादी तिला त्याच्या घरी घेऊन गेला आणि तिथून तिने धाडसी पलायन केले…….! नादिया सारखाच अनेक तरुणींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण काही जणींना यश-अपयश आले काही तरुणीने अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली तर काहींची हत्या करण्यात आली. पलायन करणार्‍या तरुणींना या आंधळ्या,बहिऱ्या लालची, मुक्या समाजाने त्या तरुणिना पुन्हा दहशतवाद्यांच्या तावडीत दिले. इतकी भयानक परिस्थिती असूनही नादिया ला मात्र एका सुन्नी कुटुंबाचा आधार मिळतो या कुटुंबातील सर्वजण जिवावर उदार होऊन नादियाला पळून जाण्यास मदत करतात.

जागतिक महासत्तांचे राजकारण, शस्त्रास्त्र निर्मितीला बंदी घालूनही चोरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र निर्मिती करावयाची आणि दहशतवाद्यांना छुप्या मार्गाने पोचवायची. असा छुपा पाठिंबा मिळत असल्याने दहशतवादी संघटना फोफावत आहेत. 2014 अगदी अलीकडच्या काळात इतका मोठा नरसंहार झाला, महिलांच्या वर शब्दातीत होणारा अत्याचार नादीयाच्या सुटकेनंतर समजतो याचे वैषम्य वाटते. नादीयावर इतके अत्याचार होऊनही ती म्हणते, “ मी कधीच आत्महत्येचा विचार केला, नाही ना मला कधी स्वतःची घृणा वाटली”. नादिया जिवंत राहिली स्वतः वरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी, आई- भावांच्या, गावकऱ्यांच्या (यजीदीच्या ) हत्यांची दाद मागण्यासाठी आणि आयसिसच्या ताब्यातील हजारो यजदी तरुणींना, लहान मुलांना सोडविण्यासाठी!!.
अशा या अत्यंत साहसी नादिया चे आत्मकथन अनेकांना प्रेरणा देणारे ठरो.
ता. क. – सध्या नादिया यजीदी नेता, स्त्रियांच्या हक्कांची पुरस्कर्ती, नोबेल शांतता पुरस्काराची मानकरी संयुक्त राष्ट्रसंघाची सदिच्छा दूत बनली आहे.

पुस्तक परिचय: प्रा. कु. सुलभा तांबडे